
'कोंबडीला अॅसिडिटी'; घराबाहेर पडण्यासाठी इसमाची अनोखी शक्कल
लॉकडाउनच्या काळात कामाशिवाय घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. मात्र, घरात बसून कंटाळलेले अनेक जण बाहेर पडण्यासाठी नामी शक्कल लढवत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घराबाहेर पडण्यासाठी त्याने चक्क कोंबडीच्या पोटात दुखतंय असं कारण पोलिसांना दिलं. त्यामुळे सध्या हा मजेदार व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल होत आहे. (man-steps-out-during-lockdown-tells-cops-his-hen-has-constipation-issues)
कर्नाटकमधील गदग जिल्ह्यात हा भन्नाट किस्सा घडला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने दिलेलं कोंबडीचं कारण ऐकून पोलिसांनादेखील हसू अनावर झालं. मात्र, त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला थेट घरी जाण्याचा सज्जड दम दिला.
सोशल मीडियावर चर्चेत येत असलेला इसम लॉकडाउन असतांनादेखील घराबाहेर पडला. त्यामुळे पोलिसांनी त्याला या परिस्थितीत घराबाहेर काय करताय? कुठे चाललात? असा प्रश्न विचारला. त्यावर या इसमाने पिशवीतून एक कोंबडी बाहेर काढत तिला अॅसिडीचा त्रास होतोय त्यामुळे तिला घेऊन पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे चाललोय असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे त्याचं हे कारण ऐकून पोलिसदेखील हसू लागले. हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत असलेला व्यक्ती कोंबडीला अॅसिडिटीचा त्रास होत असल्यामुळे तिला घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यात जात असल्याचं सांगत आहे. मात्र, पोलिसांनी त्याला पुन्हा घरी जाण्यास सांगितलं, असं कॅप्शन नेटकऱ्याने या व्हिडीओला शेअर करतांना दिलं आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोबतच लॉकडाउनच्या काळात या इसमाने भन्नाट शक्कल लढवली असंही अनेकांनी म्हटलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.