सावरकरांकडूनच धर्माच्या आधारावर फूट पाडण्यास सुरवात: अय्यर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

वादग्रस्त विधाने करण्याचा मणिशंकर अय्यर यांचा इतिहास मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "नीच' म्हटल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाने गेल्याच वर्षी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तरीही त्यांची ही सवय अद्याप कायम असल्याचे त्यांनी नुकत्याच केलेल्या विधानांमुळे दिसत आहे.

लाहोर : वि. दा. सावरकर यांनीच देशात सर्वप्रथम द्विराष्ट्र ही संकल्पना मांडली आणि धर्माच्या आधारावर जनतेमध्ये फूट पाडण्यास सुरवात केली, असा वादग्रस्त दावा कॉंग्रेसचे माजी नेते मणिशंकर अय्यर यांनी आज लाहोर येथे केला. त्यांच्या या विधानावर टीका होत आहे. 

लाहोर येथील एका कार्यक्रमात अय्यर यांनी हे विधान केल्याचे वृत्त "एएनआय' वृत्तसंस्थेने दिले आहे. "भारतातील सध्याची परिस्थिती बिकट आहे. 1923 ला वि. दा. सावरकर नावाच्या व्यक्तीने "हिंदुत्व' हा शब्द तयार केला. हा शब्द कोणत्याही धार्मिक ग्रंथांमध्ये नाही. त्यामुळे द्विराष्ट्र संकल्पनेचे पहिले प्रचारक असलेले हे सध्या भारतात सत्तेत असलेल्यांचे वैचारिक गुरू आहेत,' असे मणिशंकर म्हणाले. महंमद अली जीना यांच्या तैलचित्रावरून त्यांनी गेल्या आठवड्यात ओढवून घेतलेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "मी जीनांना कायदे आझम म्हटल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. एम. के. गांधी यांना महात्मा गांधी म्हणणारे अनेक पाकिस्तानी मला माहित आहेत. मात्र यामुळे ते देशद्रोही पाकिस्तानी ठरतात का,' असा सवाल अय्यर यांनी केला. 

वादग्रस्त विधाने करण्याचा मणिशंकर अय्यर यांचा इतिहास मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "नीच' म्हटल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाने गेल्याच वर्षी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तरीही त्यांची ही सवय अद्याप कायम असल्याचे त्यांनी नुकत्याच केलेल्या विधानांमुळे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पाकिस्तानचे जनक महंमद अली जीना यांच्यावर स्तुतिसुमने उधळत वाद ओढवून घेतला होता. जीना हे "कायदे आझम' असल्याने त्यांचे तैलचित्र का काढून टाकायचे, असे ते म्हणाले होते. 
 

Web Title: Mani Shankar Aiyar says Savarkar was first proponent of two-nation theory