रस्‍ते बांधणीमुळे विजयाचा मार्ग सुकर; मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेनसिंह | N. Biren Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेनसिंह
रस्‍ते बांधणीमुळे विजयाचा मार्ग सुकर; मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेनसिंह | N. Biren Singh

रस्‍ते बांधणीमुळे विजयाचा मार्ग सुकर; मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेनसिंह

इंफाळ : इंफाळ खोऱ्यात हिंदुबहुल आणि अन्यत्र बहुसंख्‍य ख्रिस्ती आदिवासी जमाती असे विभाजन असलेल्या मणिपूरमध्ये भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्‍वास वाटत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्री नोंगथोम्बाम बिरेनसिंह (N. Biren Singh) यांच्‍या सरकारने राज्यात उभारलेले रस्त्यांचे जाळे व वीज पुरवठा हे आहे. (Political News)

पराभव झालेल्या जागांवर लक्ष

नोंगथोम्बाम बिरेन सिंह यांनी गेल्या पाच वर्षांत मणिपूरमध्ये रस्ते उभारणीवर भर दिला आहे. तसेच ऊर्जेच्या दृष्टिनेही सकारात्मक पावले उचलली आहेत. शिवाय भाजप व त्याच्याशी संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांचे काम तळागाळापर्यंत पोहचलेले असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्‍वास पक्षाच्या केंद्रीय नेते व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा: अपघातात मृत्यू झालेल्या झोमॅटो बॉयच्या पत्नीला कंपनीकडून नोकरी

२०१७मधील निवडणुकीत भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी ज्या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना कमी फरकाने पराभव पत्करावा लागला होता, आशा १२ जागांवर विशेष लक्ष देणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. यातील नऊ मतदारसंघात भाजपचे उमेदवार एक हजारपेक्षा कमी फरकाने हरले होते. सिगोलबंद येथील उमेदवाराचा तर केवळ १९ मतांनीच पराभव झाला होता.

‘विकासकामांचा लाभ मिळेल’

सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा मंत्री थोंगम बिश्‍वजितसिंह म्हणाले की, गेल्या वेळी जेथे आमचा कमी मतांनी पराभव झाला, त्याचे विश्‍लेषण करून त्यानुसार भाजपने रणनीती ठरविली आहे. राज्यात दळणवळणासाठी उत्तम रस्ते आणि दुर्गम भागांतील घरांपर्यंत वीज नेण्याचे जे काम आमच्या सरकारने केले आहे, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. सरकारने २०१७ ते २०२० या काळात सुमारे एक हजार ५६० .२६ किलोमीटरचे रस्ते बांधले, दुरुस्ती केली किंवा सुधारणा केली आहे.

हेही वाचा: यूपीत 2017 च्या तुलनेत भाजपला मोठा विजय मिळेल - केशव प्रसाद मौर्य

याशिवाय दुर्गम भागातील जनतेला वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी पुलांची धोरणात्मक बांधणीही केली आहे.

राज्यात २४ तास वीज

‘‘मणिपूरमध्ये पूर्वी सर्वसाधारणपणे १८ तासांपेक्षा कमी वीजपुरवठा होत असे. राज्य ऊर्जा वितरण कंपनीने त्यात वाढ केल्याने २०२१पासून २४ तास वीज मिळू लागली आहे. देखभाल -दुरुस्तीच्या तातडीच्या कामांसाठी आणि नियोजित कामांसाठीच आता वीज खंडित करण्याची वेळ येते,’’ असा दावाही बिश्‍वजितसिंह यांनी केला. २०१७पासून सौर ऊर्जा प्रकल्पांमध्‍ये केलेल्या ११५ कोटी रुपयांची गुंतवणुकीची फळे आता दिसत आहेत, असे मणिपूर अपारंपरिक ऊर्जा विकास संस्थेच्या (मणिरेडा) अधिकाऱ्यांनी सांगितले.

मणिपूरमधील सौर ऊर्जा धोरण

११५ कोटी रु

२०१७पासूनची गुंतवणूक

२.७४ मेगावॉट

सप्टेंबर २०२१पर्यंत ग्रीड उभारणी

९८

दुर्गम गावांतील घरात वीज पुरवठा

३,०२८

सौर ऊर्जेचा वापर करणारी कुटुंबे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Manipur
loading image
go to top