‘आप’मध्ये अस्वस्थता; पक्षनिष्ठेची शपथ देण्याची शक्यता

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उत्पादन शुल्क गैरव्यवहारात अडकल्यानंतर विधानसभेत स्पष्ट बहुमत असलेल्या आम आदमी पक्षातही आलबेल
Manish sisodia aap party Arvind Kejriwal oath of allegiance politics
Manish sisodia aap party Arvind Kejriwal oath of allegiance politics eSakal

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उत्पादन शुल्क गैरव्यवहारात अडकल्यानंतर विधानसभेत स्पष्ट बहुमत असलेल्या आम आदमी पक्षातही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उद्या (ता. २५) दिल्लीतील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. यात ‘आम्ही कोणत्याही स्थितीत आपमधून फुटणार नाही,’ अशी शपथ किंवा त्यांच्याकडून घेतली जाईल अशा हालचाली आहेत. केजरीवाल यांनी आज ‘आप’च्या राजकीय व्यवहार समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा केली. बैठकीला सिसोदिया, संजय सिंह, गोपाल राय, आतिशी, एन.डी गुप्ता, दुर्गेश पाठक, पंकज गुप्ता, राघव चढ्ढा, इम्रान हुसेन व राखी बिर्ला उपस्थित होते. भाजपकडून ‘आप’ फोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याने ‘आप’मध्ये अस्वस्थता आहे. अनेक आमदारांमध्ये चलबिचल आहे. भाजपकडून मात्र ‘आप’च्या आमदारांना धमक्या देण्याची गरजच नसल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीतील एका वरिष्ठ भाजप नेत्याच्या मते, आप पक्षाची रचनाच इतकी भुसभुशीत पायावर झाली आहे की सत्ता जाणे किंवा आपल्यावर कारवाई होणे यातील कशाचीही अंधूक चाहूल लागली तरी ‘आप’चे अनेक आमदार एका झटक्यात पक्ष सोडतील. आपचे बहुसंख्य आमदार गैरप्रकारात अडकले असण्याची व त्यामुळे त्यांच्यात घबराट पसरल्याची दाट शक्यता आहे.

सिसोदिया यांना भाजपकडून आप फोडण्याची ऑफर दिल्याची अफवा केजरीवाल यांनी ‘आप’मध्ये उभी फूट पडण्याच्या भितीतूनच पसरवली अन्यथा त्यांनी सिसोदिया यांना कोणत्या भाजप नेत्याचा फोन आला हे जाहीर करायला हवे होते, असेही या नेत्याने सांगितले. दरम्यान, केजरीवाल यांनी भाजपवर आरोप करताना सांगितले, की ‘आप’च्या अनेक आमदारांनी आपल्याशी संपर्क साधला. पक्षातून बाहेर पडा अन्यथा तुम्हाला ‘आत’ टाकू अशा धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रत्येकी २० ते २५ कोटींची लाच देण्याचेही आमिष त्यांना दाखविली जात आहे, असेही केजरीवाल म्हणाले. अजय दत्त, संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप या आमदारांना भाजपकडून फोन येत आहेत असे खासदार संजय सिंह म्हणाले.

भाजपमध्ये फेरबदल ?

दिल्ली भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली पक्षनेतृत्वाने सुरू केल्या आहेत. केजरीवाल सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रवेश वर्मा, मनोज तिवारी यासारखे खासदार आक्रमकपणे उतरले आहेत. मात्र दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता, विधानसभेतील नेते रामवीरसिंह विधूडी व अन्य नेते अपेक्षित आक्रमकपणे उतरलेले नाहीत, असा पक्षनेतृत्वाचा आक्षेप असल्याचे समजते. त्यातूनच दिल्ली भाजपमध्ये फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळते. भाजपची दिल्ली प्रदेश कार्यकारिणीच बरखास्त करून पदाधिकारी नव्याने नेमले जातील अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com