मन की बात: चीनला दणका देण्यासाठी मोदींचा स्वदेशी खेळण्यांचा नारा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 30 August 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा विचार मांडला.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा विचार मांडला. आत्मनिर्भर होण्यासाठी आपला देश जगातील खेळणी निर्मितीचे मोठे केंद्र व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. तरुण उद्योजकांनी नाविण्यपूर्ण खेळण्या, ऑनलाइन गेम्स तयार करुन भारताचा या उद्योगातील वाटा वाढवायला हवा. भविष्यात लवकरच नवीन पिढीसाठी नव्या प्रकारच्या आणि चांगल्या दर्जाच्या खेळण्या तयार करु, अशी आशा व्यक्त केली. 

प्रणव मुखर्जी अद्याप कोमातच; लष्करी रुग्णालयाने प्रकृतीबाबत दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की कोरोनाच्या काळात देश अनेक आघाड्यांवर लढाई करत आहे. त्याचवेळी घरात असलेली लहान मुले आपला वेळ कसा घालवत असतील, असा प्रश्‍न मनात उपस्थित राहतो. त्यामुळेच गांधीनगर येथील चिल्ड्रन युनिर्व्हर्सिटी, महिला आणि बालविकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि लघुउद्योग मंत्रालयाने एकत्र येऊन मुलांसाठी काय करता येईल यावर चर्चा आणि मंथन केले. या मंथनात एकच प्रमुख विषय होता आणि तो म्हणजे खेळण्या, विशेषत भारतीय खेळणी. भारतातील मुलांना नव्या प्रकारच्या खेळण्या कशा मिळतील, खेळणी निर्मितीत भारत आघाडीचा देश कसा होईल याबाबत चर्चा करण्यात आली. आता सर्वांना स्थानिक खेळण्यांना आणि निर्मितीला प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे. या आधारावरच आपण नव्या पिढीसाठी नवीन प्रकारचे खेळण्या तयार करु शकू. 

जगभरातील खेळणी उद्योगाची उलाढाल सात लाख कोटीची आहे. यात भारताचा वाटा खूपच कमी आहे. त्यामुळे भारताने खेळणी उद्योगात सहभाग वाढवणे गरजेचे आहे. आज आपण देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला आत्मविश्‍वासाने पुढे जायचे आहे. प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुलांचा सर्वांगिण विकास करण्यास खेळणी उपयुक्त ठरते. मुलांच्या आयुष्यावर खेळण्यांचा असणारा प्रभाव लक्षात घेता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही त्याचा विचार केला आहे. खेळत-खेळत शिक्षण, खेळणी तयार करणे, खेळणी तयार करणाऱ्या कारखान्यांना भेट देणे या गोष्टींचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात आला आहे. 

स्वीडननंतर आता नॉर्वेमध्येही इस्लामविरोधी दंगा; कुरानच्या प्रति फाडल्या

तरुण उद्योजकांनी ऑनलाइन गेम्स तयार करावेत. भारतातील पारंपारिक खेळणी तयार करण्यावर भर द्यायला हवा. बालपणाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या खेळण्या निर्मितीचा विचार करायला हवा. पर्यावरणपुरक खेळण्यांच्या निर्मितीवर भर हवा, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mann Ki Baat Modi slogan of indigenous toys to hit China