मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी घेतले श्रीमहालक्ष्मी देवीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पणजी : अमेरिकेत उपचार घेऊन तीन महिन्यांनी गोव्यात परतलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज माशेल व पणजीत देवदर्शन करून कामाला सुरुवात केली. देवदर्शनानंतर त्यांनी पर्वरी येथील सचिवालयात गाठले. काही मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

मुख्यमंत्री पर्रीकर हे काल संध्याकाळी गोव्यात परतल्यावर दाबोळी विमानतळावरून थेट ताळगाव येथील खासगी निवासस्थानी गेले. आज सकाळी त्यांनी माशेल येथील मल्लिनाथ देवस्थान तसेच इतर देवालयात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते सकाळी सव्वादहाच्या सुमारास पणजीतील श्रीमहालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. पुरोहिताने त्यांना चांगले आरोग्य लाभो यासाठी देवीला गाऱ्हाणे घातले.

यावेळी त्यांनी देवीच्या गाभाऱ्याला एक प्रदक्षिणा घातली. तेथे असलेल्या महादेव, रवळनाथ व रामपुरुष ग्रामपुरुष या देवांचे तसेच गणपतीचे दर्शन घेतले. अवघ्या दहा मिनिटातच पणजीतील देवदर्शन करून ते पर्वरीला सचिवालयात गेले. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ऊर्फ भाई यांच्या चाहत्यांनी पणजीतील देवालयाच्या परिसरात गर्दी केली होती. सगळ्यांना हास्य स्मित करून तसेच हात उंचावून चाहत्यांचे आभार मानले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'पर्रीकर तुम आगे बढो हम तु्म्हारे साथ है' अशा घोषणा दिल्या. अनेकांनी त्यांना 'भाई' अशा हाका मारून लक्ष वेधले त्यांनाही स्मित हास्य केले.

Web Title: Manohar Parrikar resumes duty as CM