गोव्यात भाजपचाच दावा; पर्रीकर होणार मुख्यमंत्री!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

भारतीय जनता पक्षाला गोव्यात बहुमत मिळालेले नाही. मात्र, तरीही विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याच्या अटीवर इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. दरम्यान, पर्रीकर लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

पणजी : भारतीय जनता पक्षाला गोव्यात बहुमत मिळालेले नाही. मात्र, तरीही विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याच्या अटीवर इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. दरम्यान, पर्रीकर लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (रविवार) गोव्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर पर्रीकर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, "गोव्यात पर्रीकर यांनी चांगले काम केले आहे. पर्रीकर यांना मुख्यमंत्री केले तरच आम्ही पाठिंबा देऊ, असे महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले. अद्याप पर्रीकर यांनी राजीनामा दिलेला नाही. मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी ते राजीनामा देतील.' तर मनोहर पर्रीकर म्हणाले, "आम्हाला बहुमत मिळालेले नाही. जनतेने दिलेला हा कौल आहे. बहुमतासाठी लागणारा 21 हा जादुई आकडा आम्ही पूर्ण केला आहे. माझ्यावर विश्‍वास दाखविल्याबद्दल मी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटलो. ते आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देणार आहेत. एकदा निमंत्रण मिळाल्यानंतर आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून शपथविधीची तारीख निश्‍चित करणार आहोत.'

40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत भाजपला केवळ 13 जागा मिळाल्या. तर इतर पक्षांना 10 जागा मिळाल्या. या पार्श्‍वभूमीवर भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत घेतली आहे.

Web Title: Manohar Parrikar will be candidate for Goa CM