मनोज पांडेंनी चीनला सुनावले खडे बोल; पदभार स्वीकारताच म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Pandey Said wrong action against LAC would not be tolerated

मनोज पांडेंनी चीनला सुनावले खडे बोल; पदभार स्वीकारताच म्हणाले...

देशाचे संरक्षण सर्वोच्च स्थानावर आहे. मी कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे. भारत आणि चीनमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी एलएसीवरील चुकीच्या कृती खपवून घेतल्या जाणार नाही, असे भारतीय लष्कराचे नवे प्रमुख जनरल मनोज पांडे (Manoj Pandey) यांनी रविवारी सांगितले. पदभार स्वीकारताच लष्करप्रमुखांनी चीनला (china) खडे बोल सुनावले आहेत. (Manoj Pandey Said wrong action against LAC would not be tolerated)

आम्हाला विश्वास आहे की, बोलत राहिल्यास समस्यांवर तोडगा निघेल. दोन वर्षांत आम्ही चीनच्या (china) सीमेवर आमची तैनाती मोठ्या प्रमाणात मजबूत केली आहे. लडाखमधील जुनी परिस्थिती कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतीय सैनिक महत्त्वाच्या पदांवर आहेत आणि स्थितीत कोणताही बदल किंवा भूभागाचे नुकसान होऊ देणार नाही. भारतीय लष्कराने चीनच्या कृतींना चांगले उत्तर दिले आहे, असेही मनोज पांडे (Manoj Pande) म्हणाले.

सीमावर्ती (Border) भागात अतिरिक्त उपकरणे आणि सैन्य सामील करण्यात आले आहे. त्याचवेळी लॉजिस्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावरही लक्ष केंद्रित केले आहे. एलएसीवरील तणाव कमी करणे आणि लवकरात लवकर पूर्वस्थिती पूर्ववत करणे हे उद्दिष्ट आहे. मी इतर दोन लष्करप्रमुखांना चांगल्या प्रकारे ओळखतो. तिन्ही सेवांमधील समन्वय, सहकार्य आणि संयुक्त कौशल्याची ही चांगली सुरुवात आहे. स्वदेशीकरण आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या प्रक्रियेतून नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही मनोज पांडे (Manoj Pande) म्हणाले.

शनिवारी पदभार स्वीकारला

जनरल मनोज पांडे यांनी शनिवारी नवे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. जनरल पांडे यांनी साऊथ ब्लॉकमध्ये एका ब्रीफिंग समारंभात जनरल नरवणे यांच्याकडून पदभार स्वीकारला. जनरल एम. एम. नरवणे यांच्या निवृत्तीनंतर पांडे हे २९ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. नरवणे हे शनिवारीच निवृत्त झाले आहेत.

टॅग्स :ChinaIndia