माहिती प्रसारण खात्यातून इराणींना डच्चू; गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 14 मे 2018

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री मंत्रिमंडळात काही लक्षणीय फेरबदल केले. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेले अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या खात्याचा अतिरिक्त कारभार पीयूष गोयल यांच्याकडे दिला आहे. सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या स्मृती इराणी यांच्याकडून माहिती व प्रसारण खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याच खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे माहिती प्रसारण खात्याचा स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला आहे. 

इराणी यांनी शिक्षण खात्यात वाद निर्माण केल्यानंतर त्यांना तेथून हलविण्यात आले होते. माहिती प्रसारण खात्यातही त्यांची शैली वादग्रस्त ठरली होती. फेक न्यूज बाबतचा फतवा, ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देणे, याबाबतचे त्यांचे निर्णय प्रचंड वादात सापडले होते. या वादांमध्ये नुकताच झालेला राष्ट्रीय चित्रपट वितरण सोहळा हा भर घालणारा ठरला. खुद्द मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांमध्येही त्यांच्या शैलीविषयी प्रचंड नाराजी होती. निवडणुकीच्या वर्षातच प्रसारमाध्यमांशी संघर्ष त्यांना भोवला आहे. इराणी यांच्याकडे आता फक्त वस्त्रोद्योग खाते राहिले आहे. 

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आजच मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची तब्बेत ठीक होईपर्यंत त्यांच्याकडील अर्थ व कंपनी कारभार खात्याचा कार्यभार पीयूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांना बढती देण्यात आली आहे. पेयजल व स्वच्छता या खात्याच्या कार्यभारातून त्यांना मुक्त करण्यात आले असून, माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. 
अल्फॉन्स कन्ननथनम यांच्याकडील इलेक्‍ट्रॉनिक्‍स खाते काढून घेण्यात आले असून, ते आता केवळ पर्यटन मंत्री असतील.

Web Title: mantrimandal arun jaitley smriti irani piyush goyal Ministry of Finance