काँग्रेस-जेडीएसचे अनेक नेते भाजप प्रवेशास उत्सुक : येडियुरप्पा

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 28 जागांपैकी 25 जागा जिकंण्यासाठी प्रयत्न करा.

- येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री

बंगळुरु : काँग्रेस आणि जेडीएसचे नाराज आमदार आमच्या संपर्कात असून, ते भाजपमध्ये प्रवेशास तयार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली. तसेच बंगळुरूमध्ये सुरु असलेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस-जेडीएस आघाडीला 'अपवित्र आघाडी' संबोधत हे सरकार 5 जुलैला 'अल्पमतातील अर्थसंकल्प' सादर करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच भाजपच्या राज्य कार्यकारिणीची काल (शुक्रवार) बैठक घेण्यात आली. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस मुरलीधरराव, केंद्रीयमंत्री अनंत कुमार, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर उपस्थित होते. यावेळी येडियुरप्पा म्हणाले, की सध्याच्या राजकीय वातावरणात काँग्रेस आणि जेडीएसमधील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेशास उत्सुक आहेत. तसेच आपल्या राजकीय समीकरणांवर परिणाम होईल, असा कोणताही पूर्वग्रह न बाळगता प्रामाणिक आणि शक्तिशाली नेत्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करावा. भाजपमध्ये येण्यास इच्छुक असणाऱ्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांची गळाभेट घ्यावी आणि पक्षाला लोकसभा निवडणुकीपूर्वी मजबूत करावे. याशिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 28 जागांपैकी 25 जागा जिकंण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

दरम्यान, कॅबिनेट विस्तारापूर्वी झालेल्या काँग्रेस-जेडीएस मतभेदानंतर येडियुरप्पा यांनी दावा केला होता, की सत्ताधारी पक्षातील नाराज नेते भाजपमध्ये प्रवेशास उत्सुक आहेत. अहमदाबाद दौऱ्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत सत्ताधारी पक्षातील नाराज आमदारांचा मुद्दा उपस्थित करून कर्नाटकात पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली होती. कुमारस्वामी यांनी जेडीएसच्या जाहीरनाम्यात खोटी आश्वासने दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 

Web Title: Many Congress JDS Leaders Ready To Join BJP Claims BS Yeddyurappa