esakal | मराठा आरक्षण : संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Raje_President

संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह गुरुवारी राष्ट्रपती रामनात कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चा समाधानकारक झाल्याचं नंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

संभाजीराजे म्हणाले, इतर काही राज्यांप्रमाणं महाराष्ट्रात ५० टक्क्यांवर आरक्षण न्यायचं असेल तर अडचणी आहेत. कारण इंद्रा सहानी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे म्हटलंय की, राज्ये ५० टक्क्यांच्यावर आरक्षण देऊ शकत नाही. पण ५० टक्क्यांच्यावर जर मर्यादा वाढवायची असेल तर तुम्ही असामान्य परिस्थितीत मोडत असाल तरचं ही मर्यादा वाढवता येऊ शकते. असामान्य परिस्थिती म्हणजे काय तर तुम्ही दुर्गम भागात राहत असाल तर तुम्हाला आरक्षण ५० टक्क्यांच्यावर मिळू शकेल. त्यामुळं १०५ व्या घटना दुरुस्तीनं राज्यांना ५० टक्क्यांच्यावर आरक्षण नेण्याचे अधिकार दिलेले असले तरी आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना विनंती केली की असामान्य परिस्थितीच्या व्याख्येत जर भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला बदल करण्याबाबत तुम्ही संसदेला किंवा आवश्यक ठिकाणी तुम्ही सांगू शकला तर खऱ्या अर्थानं राज्यांचे अधिकार अबाधित राहतील, असं आम्हाला वाटतं.

केंद्रानं ही जबाबदारी घ्यावी

दुसरा मुद्दा आम्ही त्यांना सांगितला की, जर ही व्याख्या बदलता येणार नसेल तर आम्हाला ५० टक्क्यांची मर्यादा वाढवून द्या. म्हणजे काय तर EWS आरक्षणं कसं वाढवून दिलं आहे तसं केंद्रानं मराठा आरक्षणासाठी आरक्षण वाढवून द्यावं. ही झाली केंद्राची जबाबदारी. त्यानंतर राज्यांच्या जबाबदारीबाबतही आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यासाठी राज्यानं सुरुवातीला मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागास म्हणून घोषीत करणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत राज्यांचे आरक्षण वाढवण्याचे अधिकार आबाधित असले तरी मराठा समाज स्वतःला SEBC प्रवर्गात समाविष्ट होऊ शकत नाही.

शिष्टमंडळाच्या भेटीनंतर राष्ट्रपती म्हणाले...

या आमच्या मागण्यात राष्ट्रपतींनी सविस्तरपणे ऐकून घेतल्या आणि त्यानंतर ते म्हणाले, मी शांतपणे तुमचं सर्वकाही ऐकून घेतलं आहे. तुम्ही मला थोडा वेळ द्या, याचा मी अभ्यास करतो आणि पुढची दिशा काय असेल ते तुम्हाला कळवतो. यावर आमच्या शिष्टमंडळाचंही एकमत झालं. तसंच राष्ट्रपतींनी यामध्ये रस दाखवल्यानं मी सर्व पक्षांच्या सर्व खासदारांच्यावतीनं राष्ट्रपतींच आभार मानतो.

loading image
go to top