पोलिसांनी माझी चौकशी केली; मग अमित शहांची का नाही? : केजरीवाल 

File photo of Arvind Kejriwal
File photo of Arvind Kejriwal

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना सत्ताधारी 'आप'च्या आमदारांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी आज (शुक्रवार) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापे घातले. यानंतर 'अमित शहा यांची चौकशी करण्यातही पोलिसांनी असाच उत्साह दाखवायला हवा होता' अशा शब्दांत केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांवर टीका केली. 

'आप'चे आमदार अमानतुल्ला खान आणि प्रकाश जरवाल यांनी सोमवारी सायंकाळी केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अंशू प्रकाश यांना मारहाण केली. वैद्यकीय चाचणीमध्येही अंशू प्रकाश यांना मारहाण झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी छापा घातला. सोमवारचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. 

'अंशू प्रकाश भाजपचे एजंट आहेत' असा आरोप 'आप'ने केला होता. पोलिसांच्या छाप्यांनंतरही केजरीवाल यांनी हीच भूमिका कायम ठेवत या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. 'माझ्या घरावर छापे घालताना पोलिसांचा उत्साह दिसला. तसाच उत्साह न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अमित शहा यांची चौकशी करतानाही दाखवायला हवा होता' अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. दुसरीकडे, दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज सकाळी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांची भेट घेऊन प्रशासकीय कामातील अडथळ्यांबाबत गाऱ्हाणी मांडली. 

सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीदरम्यान खान आणि जरवाल या दोन आमदारांनी अंशू प्रकाश यांना मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी प्रकाश यांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. शिवाय, या मारहाणीचा निषेध म्हणून दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 'काम बंद' आंदोलन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com