बेळगाव महापालिका आयुक्त कुरेर यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 36 केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. बेळगाव महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांचेही नाव बदली यादीत आहे.  

बेळगाव - बेळगाव महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांच्या बदलीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यशासनाने त्यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 36 केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत कुरेर यांचेही नाव आहे. बागलकोट येथे अप्पर जिल्हाधिकारी या पदावर त्यांची बदली झाली आहे.

कुरेर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. शिवाय कुरेर यांच्या बदलीमुळे स्मार्ट सीटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याबाबतही शासनाकडून स्पष्टं आदेश आलेला नाही. कुरेर यांची बदली गेल्या आठवड्यात झाली आहे, पण त्यांचा बदली आदेश मात्र जारी झाला नव्हता. गेल्या आठवड्यात बदली झालेल्या केएएस अधिकाऱ्यांची पहिली यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. त्यात कुरेर यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे कुरेर यांची बदली रद्द झाली की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. महापालिका वर्तुळात याची दबक्‍या आवाजात चर्चा सुरू होती. पण दुसऱ्या यादीत कुरेर यांचे नाव आहे, त्यामुळे आता त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले आहे. कुरेर हे सप्टेंबर 2016 साली महापालिका आयुक्‍तपदी रूजू झाले होते. त्याआधी ते बुडा आयुक्त म्हणून कार्यरत होते. स्मार्ट सीटी योजनेचे नियमित व्यवस्थापकीय संचालक मुल्लाई मुहीलान यांची बदली झाल्यानंतर कुरेर यांच्याकडे या योजनेची अतिरीक्त जबाबदारी देण्यात आली होती. ऑटोनगर येथील अनधिकृत शीतगृहांच्या प्रकरणात महापालिका प्रशासनावर आरोप झाले होते. त्यानंतर लागलीच त्यांची बदली झाल्यामुळे विविध तर्कवितर्क व्यक्त होत होते. पण निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पण महापालिका आयुक्तपदी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार याबाबतची उत्सुकता कायम आहे. नव्या आयुक्तांकडेच स्मार्ट सीटी योजनेची जबाबदारी दिली जाणार का? याबाबतही उत्सुकता आहे.

Web Title: marathi news belgaum corporation commissioner transfer