9 मुलांना चिरडणारा भाजप नेता पोलिसांना शरण

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

अखेरीस त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातातील मुख्य आरोपी म्हणून बैथाचे नाव घेतले जात आहे. 

मुझफ्फरपूर (बिहार) : शनिवारी (ता. 24) बिहारमधील मुझफ्फरपूर येथे निलंबित भाजप नेता मनोज बैथा याने मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडीने शाळेतील 9 विद्यार्थ्यांना चिरडले होते, त्यांचा जागीच मृत्यू झाला. पण त्यानंतर तो फरार होता व देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर आज (ता. 28) अखेरीस त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातातील मुख्य आरोपी म्हणून बैथाचे नाव घेतले जात आहे. 

या अपघातात 9 मुले चिरडली गेली, त्याशिवाय 10 मुले जखमी झाली. अपघातात बैथा देखील जखमी झाल्याने सितामढी येथील श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालयात त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आले, यानंतर काही तासांतच तो पोलिसांच्या शरण गेला. बैथाने स्वतःवरील आरोप नाकारात, त्याचा या अपघातात सहभाग नसल्याचे पोलिसांना सांगितले. आज त्याला न्यायालयात हजर केले जाईल. 

भाजपने बैथा याच्यावर दबाव आणत त्याच्याकडून राजीनामा घेतला. बैथाचे भाजप व जनता दल युनायटेड या पक्षांशी चांगले संबंध होते, त्यांनीच बैथा याला या काळात आश्रय दिला असा आरोप केला जात आहे. याच कारणांमुळे या दोन पक्षांवर विरोधकांकडून टिका होत आहे.   

Web Title: Marathi news bihar news 9 childs dies accident bjp leader surrender