गडकरींना रेल्वे, प्रभूंना पर्यावरण खाते मिळण्याची शक्यता; फेरबदलास वेग

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

उद्या विस्तार शक्‍य; राजीवप्रताप रुडींचा राजीनामा

रुडी हे बिहारमधील सरन येथील खासदार आहेत. अमित शहा आणि मोदी यांच्यात आज झालेल्या चर्चेमध्ये रुडी यांच्यासह सहा ते सात मंत्र्यांच्या नावांबाबत चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेनंतर लगेचच रुडी यांनी राजीनामा दिला.

नवी दिल्ली : मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता असून, रेल्वे व रस्ते वाहतूक यांचे एकत्रित नवे वाहतूक मंत्रालय निर्माण करण्यात येईल असे संकेत आहेत. सध्या रस्ते व जहाजबांधणी खाते सांभाळणारे नितीन गडकरी यांच्याकडे हे खाते राहील, त्यामुळे रेल्वेची जबाबदारीही त्यांच्याकडे जाईल. तर विद्यमान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी यांनी गुरुवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच रुडी यांनी राजीनामा दिला. विद्यमान मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी अमित शहा यांनी मोदींची भेट घेतल्याने फेरबदलाच्या हालचालींना वेग आल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन सप्टेंबरला हा बदल होणे अपेक्षित आहे. किंवा रविवारीही याबद्दलच्या घोषणा होऊ शकतात. केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री असलेले राजीवप्रताप रुडी यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये पुन्हा एकदा सामील झालेल्या "जेडीयू'ला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्‍यता आहे. रुडी हे बिहारमधील सरन येथील खासदार आहेत. अमित शहा आणि मोदी यांच्यात आज झालेल्या चर्चेमध्ये रुडी यांच्यासह सहा ते सात मंत्र्यांच्या नावांबाबत चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेनंतर लगेचच रुडी यांनी राजीनामा दिला. केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनीही प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याची तयारी दर्शविली असल्याचे काही सूत्रांनी सांगितले. या दोन मंत्र्यांव्यतिरिक्त गिरिराज सिंह, विजय सांपला, महेंद्र पांडे, कलराज मिश्र, उपेंद्र कुशवाहा, चौधरी वीरेंद्रसिंह यांचीही खाती काढून घेतली जाण्याची शक्‍यता आहे.

पक्षाची जबाबदारी सोपविणार
शहा यांनी गेल्या काही महिन्यांत सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. हा आढावा आणि 2019ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत मंत्रिमंडळातील सहा ते सात जणांकडून खाते काढून त्यांना पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे समजते. या मंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मंत्र्यांचा प्रामुख्याने समावेश असल्याचेही समजते. काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होणे अपेक्षित आहे. संरक्षण मंत्रिपदाची अतिरिक्त जबाबदारी असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आजच लवकरच संरक्षण मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचे सूचक विधान केले आहे. मंत्रिपदापासून दूर केलेल्या मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षामध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: marathi news cabinet reshuffle ministeries nitin gadkari, suresh prabhu