गोव्यासमोर कर्नाटक नमले

अवित बगळे 
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

म्हादई जल वाटप तंटा लवादासमोर आजच्या सुनावणीवेळी गोव्याचे जलसंपदामंत्री विनोद पालयेकर हेही उपस्थित होते. त्यांनी आजवर वेळोवेळी दिल्लीला भेट देऊन या खटल्याचा पाठपुरावा केला आहे. कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविल्याची खबर गेल्या महिन्यात मिळताच त्यांनी कणकुंबी येथे जाऊन पाहणीही केली होती. 

पणजी (गोवा) : गोव्यात मांडवी नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीच्या पात्रात वळविण्यासाठी कोणतेही बांधकाम करणार नाही आणि लवादाचा निर्णय येईपर्यंत पाणी वळवणार नाही अशी हमी कर्नाटक सरकारला आज म्हादई जल वाटप तंटा लवादासमोर द्यावी लागली. लवादासमोर आज गोव्याने हस्तक्षेप याचिका, अवमान याचिका आणि अंतिम सुनावणीसाठी आपले म्हणणे लेखी स्वरुपात सादर केले. त्याला उत्तर देताना सायंकाळी कर्नाटकाने ही हमी दिली. 

दिल्लीत आज लवादासमोर पूर्वीच ठरल्यानुसार म्हादई जल वाटपाबाबत अंतिम सुनावणी सुरु झाली. गोव्याने कर्नाटक आणि महाराष्टाला यात प्रतिवादी केले आहे. म्हादईच्या एका उपनदीवर महाराष्ट्र सरकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विर्डी येथे धरण बांधून ते पाणी पळवू पाहत असल्याचा गोव्याचा आरोप आहे. आजच्या या सुनावणीवेळी गोव्याकडून कर्नाटकाने म्हादईचे पाणी मलप्रभेच्या पात्रात वळविण्यासाठी चालवलेल्या हालचालींची माहिती देण्यात आली.

लवादाकडून याची गंभीर दखल घेण्याची शक्‍यता वाटल्याने कर्नाटक सरकारने लवादाने या प्रश्‍नी निर्णय देईपर्यंत कोणतेही बांधकाम करणार नाही आणि पाणीही वळविणार नाही अशी हमी दिली. लवादाने यापूर्वी दिलेल्या आदेशांचे पालनही केले जाईल असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे. गोवा सरकारने सादर केलेल्या हस्तक्षेप याचिकेवरील पुढील सुनावणी 13 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. या खटल्यात गोवा सरकराची बाजू ज्येष्ठ वकील आत्माराम नाडकर्णी मांडत आहेत. ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजपासून सुरु होणाऱ्या अंतिम सुनावणीसाठी बाजू मांडण्यासाठी गेले काही आठवडे तयारी चालविली होती. या विषयाचा एकही संदर्भ चुकू नये अशी दक्षता त्यांनी घेतली होती. मात्र आज सुनावणीवेळी कर्नाटकाचे वकील बाजू मांडण्याच्या तयारीत आलेच नव्हते असे दिसून आले. 

लवादासमोर बाजू मांडण्याऐवजी कर्नाटकाचे वकील अशोक देसाई आणि इंदिरा जैसिंग यांनी लवादाला ऑगस्टपर्यंत देण्यात आलेली वेळ अपुरी आहे. त्यामुळे लवादाची मुदत वाढवून घेऊ या असे मुद्दे मांडण्यास सुरवात केली. यासाठी सर्वांनीच प्रयत्न करू या असेही आवाहन त्यांनी लवादासमोर केले. कर्नाटकाचे वकील सुनावणीसाठी तयार नसल्याचे दिसून आले त्यानंतर लवादाकडून गोव्याची बाजू मांडण्याची तयारी आहे का अशी विचारणा करण्यात आली. त्यावर ऍड नाडकर्णी यांनी आपली तयारी असल्याचे नमूद केले. अखेर कर्नाटकाच्या विनंतीवरून सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आली. कर्नाटकात विधानसभा निवडणूक कोणत्याही वेळी जाहीर होऊ शकते. त्यामुळे कर्नाटक सरकारकडून या प्रश्‍नी वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याचे आजच्या एकंदरीत वातावरणावरून दिसले. 

ऍड नाडकर्णी यांच्यासह महाधिवक्ता दत्तप्रसाद लवंदे, साल्वादोर संतोष रिबेलो, निकीता नाडकर्णी, अमोघ प्रभुदेसाई, अक्षया जोगळेकर, अरबिंदो गोम्स परेरा, अशिष कुंकळ्ळीकर, अश्‍वेक गोसावी, मयुरी चावला, जलसंपदा खात्याचे अतिरीक्त मुख्य अभियंता प्रेमानंद कामत, पर्यवक्षेक्षक अभियंता एस.डी. पाटील, सल्लागार चेतन पंडित आदींनी या सुनावणीसाठी सारी तयारी केली आहे. 

म्हादई जल वाटप तंटा लवादासमोर आजच्या सुनावणीवेळी गोव्याचे जलसंपदामंत्री विनोद पालयेकर हेही उपस्थित होते. त्यांनी आजवर वेळोवेळी दिल्लीला भेट देऊन या खटल्याचा पाठपुरावा केला आहे. कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविल्याची खबर गेल्या महिन्यात मिळताच त्यांनी कणकुंबी येथे जाऊन पाहणीही केली होती. 

Web Title: Marathi news Goa news Mhadai river water