गुजरातमधील सर्व 'हुक्का बार' बंद 

महेश शहा
बुधवार, 5 जुलै 2017

अहमदाबाद : गुजरात सरकारने आजपासून राज्यभरातील सर्व हुक्का बार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, यासंबंधीचे विधेयक गुजरात विधिमंडळाने मार्च महिन्यात मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींनी आज त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली आहे. अशा प्रकारच्या हुक्का बारवर बंदी घालणारे गुजरात हे देशातील पहिलेच राज्य बनले आहे. 

अहमदाबाद : गुजरात सरकारने आजपासून राज्यभरातील सर्व हुक्का बार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, यासंबंधीचे विधेयक गुजरात विधिमंडळाने मार्च महिन्यात मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींनी आज त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली आहे. अशा प्रकारच्या हुक्का बारवर बंदी घालणारे गुजरात हे देशातील पहिलेच राज्य बनले आहे. 

हुक्का बारमुळे तरुणांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत असल्याने त्यावर बंदी घालण्याच्या मागणीने जोर धरला होता. याबाबत गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा म्हणाले की, '' केंद्राने 2003 मध्येच या अनुषंगाने कायदा केला होता, गुजरात सरकारने 'सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादन कायदा- 2003' मध्ये सुधारणा घडवून आणत प्रतिबंधात्मक पदार्थांच्या श्रेणीमध्ये हुक्‍क्‍याचाही समावेश केला आहे. तशी अधिसूचना आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आली. 

कठोर शिक्षेची तरतूद 
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात पोलिस कठोर कारवाई करणार असून, यात 1 ते 3 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच दोषी व्यक्तीस 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. अशा प्रकारचे कृत्य दखलपात्र गुन्हा ठरणार असून, बेकायदा हुक्का बार चालविणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास मोहीम राबविली जाणार आहे. 

कारवाईचा बडगा 
आतापर्यंत पोलिसांनी अहमदाबादेतील 62, राजकोटमधील एक, सुरतमधील पाच आणि बडोद्यातील दोन हुक्का पार्लरना टाळे ठोकले आहे. अन्य शहरांमधील हुक्का बारवर याआधीच कारवाई करण्यात आली आहे. बरेच हुक्का बार हे रेस्टॉरंटच्या परवान्यावर सुरू होते. तसेच या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याने याचा तरुणांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता, यामुळे राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला. 

सिगारेटपेक्षाही धोकादायक 
नियमितपणे हुक्का बारला जाणारी व्यक्ती सिगारेटपेक्षा शंभर ते दोनशेपटीने अधिक धूर आपल्या फुफ्फुसांमध्ये ओढत असते. सर्वसाधारणपणे एक धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती सिगारेटचे 20 झुरके घेते; पण हुक्का पार्लरमध्ये जाणारा दोनशे झुरके घेतो. हुक्‍क्‍यामधील कार्बन मोनोक्‍साईडसारखे घटक शरीरास हानिकारक असतात. हुक्‍क्‍यामध्ये 'कार्सिनोजेनिक'सारखे धोकादायक घटकही आढळून आल्याचे अमेरिकी कॅन्सर सोसायटीने म्हटले आहे.

Web Title: marathi news gujrat news ahmedabad hukka parlour health mahesh shah