दिल्लीतील बावड्यांचे गुगलकडून डिजीटाईजेशन

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

नवी दिल्ली - दिल्लीतील ऐतिहासिक बावड्या वाढत्या शहरीकरणामुळे लुप्त होत चालल्या असतानाच गुगलने शहरातील सात बावड्यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या बावड्या शहरातील पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. या बावड्या द इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (इन्टॅक) ही संस्था गुगलच्या सहयोगाने डिजीटाईज करणार आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील ऐतिहासिक बावड्या वाढत्या शहरीकरणामुळे लुप्त होत चालल्या असतानाच गुगलने शहरातील सात बावड्यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या बावड्या शहरातील पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. या बावड्या द इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (इन्टॅक) ही संस्था गुगलच्या सहयोगाने डिजीटाईज करणार आहे.

"दिलीतील बावड्या - तळ्यांच्या दिशेने पाऊल' असे या प्रकल्पाचे नाव आहे. इसवीसन 1210-1540 दरम्यान बांधण्यात आलेल्या या बावड्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात येत आहे. या बावड्या डिजीटाईज करताना विशेष छायाचित्रांचा वापरही करण्यात येणार आहे. याबाबत "इन्टॅक'च्या समन्वयक स्वप्ना लिडल म्हणाल्या की, ""डिजीटायजेशनमुळे बावड्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील. यामधून या वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व लोकांना समजणार आहे. गुगलच्या माध्यमातून माहिती देऊन जनप्रबोधनाचे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' या ऐतिहासिक वास्तूंना पाहण्यासाठी येणाऱ्यांना माहितीचा स्त्रोत उपलब्ध असावा असाही या डिजीटायजेशनमागे हेतू असल्याचे लिडल यांनी सांगितले.

"इन्टॅक'ने सर्व बावड्यांची छायाचित्रे नव्याने काढली असून त्यांचे संकलन करण्यात आले आहे. ही छायाचित्रे संकेतस्थळावर उपलब्ध असून अँड्रॉइड मोबाईलवरही पाहायला मिळतील, असे लिडल यांनी सांगितले. सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या वास्तूंना शासनाकडून संवर्धित केले जाते. द्वारका येथील बावडीचे स्थानिक प्रशासनाकडून संवर्धन केले गेल्याचे लिडल यांनी यावेळी सांगितले.

बावड्यांकडे पर्यटकांची पाठ
दिल्ली शहरांमध्ये एकुण वीस बावड्या आजतागायत अस्तित्वात आहेत. यापैकी बहुतेक बावड्या जशाच्या तशा आहेत. मात्र माहितीअभावी पर्यटकांकडून या बावड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. देशभरात एक तर अग्रसेनची बावडी आणि हजरत निजामुद्दीन दर्गा येथील बावडी या प्रमुख बावड्या लोकांना माहित आहेत. मात्र इतर बावड्यांविषयी लोकांमध्ये माहिती कमी असल्याचे आढळते. फिरोजशाह कोटला आणि पुराना किल्ला येथील बावड्या याही तितक्‍याचा लोकप्रिय आहेत, मात्र बहुतांश पर्यटक या वास्तूंपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

Web Title: marathi news india news new delhi google digitalization