पाकिस्तान माझी काळजी घेत आहे : कुलभूषण जाधव

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जानेवारी 2018

''पाकिस्तानकडून माझी काळजी घेण्यात येत आहे. त्यांनी मला स्पर्शदेखील केला नाही. त्यांनी आईला काळजी करु नये असे सांगितले. माझ्यावर ती विश्वास ठेवते तिने मला वैयक्तिकरित्या पाहिले आहे''

(कुलभूषण जाधव, भारतीय नौदलाचे माजी अधिकारी )

इस्लामाबाद : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात शिक्षा भोगत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचा दुसरा व्हिडिओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आला. यामध्ये त्यांनी आपण सुरक्षित असून, पाकिस्तान माझी काळजी घेत असल्याचे सांगितले. 

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांनी पाकिस्तानात जाऊन 25 डिसेंबरला भेट घेतली होती. मात्र, या भेटीदरम्यान पाकिस्तानकडून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे समोर आले. त्यामुळे भारताकडून पाकिस्तानवर टीका करण्यात येत होती. सत्ताधारी भाजपसह काँग्रेसनेही या भेटीनंतर पाकिस्तानचा निषेध केला.

त्यानंतर आज कुलभूषण जाधव यांचा व्हिडिओ पाकिस्तानने जारी केला. ''पाकिस्तानकडून माझी काळजी घेण्यात येत आहे. त्यांनी मला स्पर्शदेखील केला नाही. त्यांनी आईला काळजी करु नये असे सांगितले. माझ्यावर ती विश्वास ठेवते तिने मला वैयक्तिकरित्या पाहिले आहे''.

ते पुढे म्हणाले, ''मला भारतातील नागरिक आणि भारत सरकार आणि भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांना सांगायचे मी नौदलाचे अधिकारी आहे. मला माझे अधिकार आहेत'', असे त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमधून सांगितले. 

दरम्यान, कुलभूषण जाधव भेटीवर काँग्रेसने पाकिस्तानचा निषेध केला होता. जाधव कुटुंबीयांना पाकिस्तानकडून अतिशय असभ्य वागणूक देण्यात आली. याचा भारताने जाब विचारायला हवा आणि जाधव यांना सुरक्षित मायदेशी आणण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात होती.

Web Title: marathi news international news pakistan care for me says kulbhushan jadhav