काश्मीर: लष्कराच्या कारवाईत एका दहशतवाद्यासह 4 ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

चेकपोस्टवर वाहन तपासणीसाठी संबंधित गाडी थांबवण्यास सांगितल्यानंतर लष्करी जवानांवर या गाडीतून गोळीबार करण्यात आला. 

शोपियाँ : काश्मीरच्या शोपियाँमध्ये एका दहशतवाद्यासह, त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना ठार करण्यात लष्कराला यश आले.

रविवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या शोपियाँमधील चेकपोस्टवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराने चार जणांना ठार केले. गाडीत एका दहशतवाद्यासह इतर तीन जण होते, ते या दहशतवाद्याचेच सहकारी असल्याची माहिती लष्कराने दिली. या हल्ल्यात तेही ठार झाले आहेत. पण नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसून ते तिघे सामान्य नागरिक होते.   

रविवारी रात्री आठच्या सुमारास ही चकमक झाली. चेकपोस्टवर वाहन तपासणीसाठी संबंधित गाडी थांबवण्यास सांगितल्यानंतर लष्करी जवानांवर या गाडीतून गोळीबार करण्यात आला, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव शाहिद अहमद दार असे असून, तो शोपियाँचाच रहिवाशी असून त्याच्याजवळ शस्त्र सापडल्याचे समजते.   

श्रीनगर पोलिसांनी फुटीरतावाद्यांवर नियंत्रण रहावे यासाठी श्रीनगरच्या काही भागात बंद ठेवण्यात आला आहे. दक्षिण काश्मिरमधील इंटरनेट व रेल्वेसेवा काही वेळासाठी बंद करण्यात आली आहे, त्याचबरोबर तेथील बाजारपेठ देखील बंद करण्यात आली आहे. यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता पसरली आहे. 

Web Title: Marathi news kashmir news terrorist attack 4 Killed In Kashmir Shopian 3 Were Aiding Him