बेळगावात 'ठेकेदारी' व 'टक्केवारी' बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

बेळगाव शहराची स्वच्छतेची जबाबदारी सध्या दहा ठेकेदारांकडे आहे. या ठेकेदारांकडे 1099 सफाई कामगार आहेत. त्या सर्वांना ठेकेदारांकडून वेतन दिले जाते. पण पुढील महिन्यापासून ठेकेदारांऐवजी थेट महापालिकेकडून वेतन दिले जाईल.

बेळगाव : बेळगाव शहर स्वच्छतेमधील 'ठेकेदारी' व 'टक्केवारी' बंद होणार आहे. पुढील महिन्यांपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. शहर स्वच्छतेचा ठेका महापालिकेकडून रद्द केला जाणार आहे. ठेकेदारांकडे काम करणारे सफाई कामगार आता महापालिकेचे कंत्राटी कामगार म्हणून सेवा बजावणार आहेत.

बेळगाव शहराची स्वच्छतेची जबाबदारी सध्या दहा ठेकेदारांकडे आहे. या ठेकेदारांकडे 1099 सफाई कामगार आहेत. त्या सर्वांना ठेकेदारांकडून वेतन दिले जाते. पण पुढील महिन्यापासून ठेकेदारांऐवजी थेट महापालिकेकडून वेतन दिले जाईल.

दर दोन वर्षानी या सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त केले जाईल आणि पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले जाईल. या सफाई कामगारांना दरमहा 14 हजार 400 रूपये इतके वेतन दिले जाईल. गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ शहर स्वच्छतेचे काम कंत्राटी सफाई कामगार करत आहेत. महापालिकेतील सफाई कामगारांची भरती बंद झाल्यानंतर ठेकेदारांच्या माध्यमातून शहर स्वच्छतेचे काम महापालिकेने सुरू केले. यापूर्वी 43 प्रभागांच्या स्वच्छतेचा ठेका दिला जात होता, गेल्या काही वर्षांपासून 48 प्रभागांच्या स्वच्छतेचा ठेका दिला जात आहे.

शहर स्वच्छतेचा ठेका देण्यासाठी महापालिकेकडून निविदा काढली जाते. या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन बेळगावच्या दहा ठेकेदारानी 48 प्रभागांच्या स्वच्छतेचा ठेका घेतला आहे. या ठेक्‍याची मुदत मार्च महिन्यात संपली आहे. पण नव्या ठेकेदार नियुक्तीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे दहा ठेकेदाराना मुदतवाढ देण्यात आली आहे. 

या ठेकेदारांची बिले थकल्यामुळे जून महिन्यात त्यांनी शहर स्वच्छतेचे काम बंद केले होते. पण महापौर संज्योत बांदेकर यांनी मध्यस्थी करून काम बंद आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यानंतर शहर स्वच्छतेचा ठेका न देण्याची सूचना नगरविकास खात्याने महापालिकेला दिली होती. सफाई कामगारांची थेट भरती शासनाकडून करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळेच ही सूचना देण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेने पुन्हा निविदा काढलेली नाही. आता तर थेट शहर स्वच्छतेचा ठेकाच रद्द करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कामातील ठेकेदारी बंद होणार आहे. शहर स्वच्छतेचा ठेका व त्यातील नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध हा विषय गेली चार वर्षे महापालिका वर्तुळात चर्चेत आहे. 

नियमानुसार जितके सफाई कामगार नियुक्त करावयास हवेत तेवढे कामगार नियुक्त न केल्यामुळे ठेकेदारांकडून स्वच्छतेचे काम योग्य पद्धतीने होत नाही. पण नगरसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पण आता शहर स्वच्छतेमधील ठेकेदारांची मक्तेदारीच मोडीत निघणार आहे व सफाई कामगारांची पिळवूणूकही थांबणार आहे. पण यापुढे सफाई कामगारांचे वेतन मात्र महापालिकेला नियमितपणे द्यावे लागेल. ठेकेदारांची बिले थकविणे पालिकेला शक्‍य होते, पण कामगारांचे वेतन मात्र थकविता येणार नाही.

Web Title: marathi news local news belgaon news will ends thekedari and takkevari