ऍटो संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

शहरातील ऍटो व टॅक्‍सी संघटनेचे पदाधिकारी डी. के. कांबळे (वय 35) यांचे ह्रदयविकाराच्या धक्‍क्‍याने आज शुक्रवारी (ता. सोळा) सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नांदेड - शहरातील ऍटो व टॅक्‍सी संघटनेचे पदाधिकारी डी. के. कांबळे (वय 35) यांचे ह्रदयविकाराच्या धक्‍क्‍याने आज शुक्रवारी (ता. सोळा) सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नांदेड शहराच्या पौर्णिमानागर भागात राहणारे डी. के. कांबळे हे एक ऍटो चालक होते. ते जनसेवा ऍटो, टॅक्‍सी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पहात होते. ऍटो चालकावर पोलिसांकडून अन्याय झाला तर ते स्वत: धावून जात असत. दरम्यान कांबळे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्युला सहाय्यक पोलिस निरीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करत मृतदेह चक्क वाहतूक शाखेत आणला. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर यांनी मध्यस्थी करुन मृत्तदेह पोलिस ठाण्यातून शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. त्यामुळे वजिराबाद, तारासिंह मार्केट, गुरुद्वारा चौक, गांधी पुतळा या भागातील दुकाने काही काळ बंद करावी लागली. तसेच वजिराबाद ठाण्यासमोर जमाव जमल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. यावेळी ऍटो चालक , संघटनांचे पदाधिकारी, सामाजीक कार्यकर्ते यांनीही मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. दरम्यान पोलिस निरीक्षक प्रदिप काकडे, साहेबराव नरवाडे, सुभाष राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे, शेख रहेमान, सुनील बडे, नाईकवाडे यांच्यासह मोठा फोजपाटा तैनात करण्यात आला होता.

नांदेड शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था नीट करण्यासाठी पोलिस अधिक्षक चंद्र किशोर मीना यांच्या आदेशावरून शहरातील वाहतूक शाखा काम करीत आहे. या मोहिमेत विनापरवाना ऍटोवर कारवाईचे सत्र सुरू झाले. यामुळे अनेक ऍटोचालक बेरोजगार झाले. याप्रकरणी देविदास कांबळे व अन्य संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. टी. निकम हे ऍटो चालकांचा मानसिक छळ करतात. अश्‍लील भाषेचा वापर करून ऍटोचालक व टॅक्‍सी चालकांचा अपमान करतात. त्यांनी अलिकडेच देवीदास कांबळे यांचा ऍटो जप्त केला होता. यावेळी त्यांना खूप दमदाटी केली होती. तेव्हापासून श्री. कांबळे हे तणावात वावरत असत. अखेर शुक्रवारी सकाळी देविदास कांबळे यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस निकमच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: marathi news maharashtra news nanded news autoriksha news