नाना पटोले यांचा काँग्रेसकडे युटर्न; राहुल गांधींनी केले स्वगृही स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नवी दिल्ली : भाजपला रामराम ठोकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत खासदारकीचा राजिनामा दिलेले नाना पटोले यांचा अखेर काँग्रेस प्रवेश झाला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर फोटोसह ही माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमधील छायाचित्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पटोले यांचे स्वागत करताना दिसत आहेत. राहुल गांधी पटोले यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करीत आहेत, असा या ट्वीट मधील मजकूर आहे. 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून नाना पटोले भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेल यांचा पराभव केला होता. नाना पटोले यांनी 2008 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सन 2014 मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा मतदारसंघात पराभव केला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भाजपच्या धोरणांवर नाराजी दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करत होते. शिवाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करत आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते.

नाना पटोले काँग्रेसमध्ये जातील, असे संकेत मिळत होते तरीही त्याबाबत ठोस काही समजून येत नव्हते. देवेंद्र फडणवीस जर भंडारा-गोंदियामधून लोकसभेसाठी लढणार असतील तर आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू, असे पटोले यांनी जाहीर केले होते. पटोलेंच्या काँग्रेस प्रवेशाला मुहुर्त केव्हा मिळतो याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. अखेर आज काँग्रेसने नाना पटोले आपल्या पक्षात आल्याचे जाहीर केले आहे. हा पक्षप्रवेश नक्की केव्हा झाला, याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही. काँग्रेसने केलेल्या ट्वीटमध्ये दिलेल्या छायाचित्रात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, संजय निरुपम आदींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पटोले यांचे स्वागत करताना दिसत आहेत.

Web Title: marathi news nana patole enters congress rahul gandhi welcome