संसदेचे कामकाज गोंधळामुळे तहकूब

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 मार्च 2018

नवी दिल्ली : तेलुगू देसम, तेलंगण राष्ट्रसमिती, अण्णा द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस या चार पक्षांच्या सदस्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनासमोर जाऊन केलेल्या गोंधळामुळे आज चौथ्या दिवशीही कामकाज होऊ शकले नाही. अपवाद म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यसभेत पहिल्या तासात महिला सबलीकरणावर भाषणे झाली. 

नवी दिल्ली : तेलुगू देसम, तेलंगण राष्ट्रसमिती, अण्णा द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस या चार पक्षांच्या सदस्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनासमोर जाऊन केलेल्या गोंधळामुळे आज चौथ्या दिवशीही कामकाज होऊ शकले नाही. अपवाद म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यसभेत पहिल्या तासात महिला सबलीकरणावर भाषणे झाली. 

लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या; परंतु त्यानंतर लगेचच तेलुगू देसम, तेलंगण राष्ट्रसमिती, वायएसआर काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांच्या सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी धाव घेतली. आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा या मागणीसाठी तेलुगू देसमच्या सदस्यांनी घोषणाबाजीसह सभागृह दणाणून सोडले. तेलंगण राष्ट्रसमितीच्या सदस्यांनी राखीव जागांचा कोटा वाढविण्यासाठी घोषणांचे फलक नाचवायला सुरवात केली. अण्णा द्रमुक सदस्यांनी पेरियार यांच्या पुतळ्याच्या नासधूस करण्याचा प्रकार व कावेरी पाणीतंटा या मुद्द्यांवर फलक हातात धरून आपल्या मागण्या मांडल्या. तृणमूल काँग्रेसनेही पुतळे मोडतोडीचा मुद्दा उपस्थित केला. या सर्व मध्यभागी जमलेल्या सदस्यांना काँग्रेस व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी आपापल्या जागांवरून साथ दिली. 

भाजप व शिवसेनेचे सदस्य वगळता उर्वरित बहुतेक राजकीय पक्ष हे या गोंधळात सहभागी झाले होते. 11 वाजून दहा मिनिटांनी कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बारा वाजता लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले; पण कामकाज सुरू होण्यापूर्वीच पिवळ्या रंगांचे टीशर्ट परिधान करून आलेल्या तेलुगू देसमच्या सदस्यांनी घोषणा सुरू केल्या. या गोंधळातच सभागृहाचे कामकाज सुरू झाले. सभापटलावर सरकारी दस्तावेज ठेवण्याचे काम संपल्यानंतर बारा वाजून दहा मिनिटांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

राज्यसभेतही पुनरावृत्ती 
राज्यसभेत 11 ते 12 या वेळेत शून्य काळाऐवजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सदस्यांसह मुद्दाम पुरुष सदस्यांनाही त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. हा तास सुरळीत पार पडला; परंतु बारा वाजता प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताक्षणी तेलुगू देसम सदस्यांनी व इतर पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्या मुद्द्यांवर सभापतींच्या आसनापुढे जाऊन घोषणाबाजी सुरू केली आणि या सभागृहाचे कामकाजही काही मिनिटांतच प्रथम दोन वाजेपर्यंत व दोन वाजल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

Web Title: marathi news Narendra Modi N chandrababu naidu tdp