मोदीजी, काळाचे चक्र उलटे फिरू लागलेय..!

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : केवळ साडेतीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला 80 पैकी तब्बल 73 जागांची बक्षिशी देणाऱ्या उत्तर प्रदेशात आज खुद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या लोकसभा मतदारसंघांमधील सनसनाटी पराभव हा अंतर्कलह, अतिआत्मविश्‍वास व अहंकाराची बाधा झालेल्या भाजपला जबर हादरा आहे, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे.

खुद्द संघपरिवारातील विश्‍व हिंदू परिषदेने मोदी सरकारला, 'राजस्थान, मध्य प्रदेश व आता उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांचे निकाल म्हणजे काळाचे चक्र उलटे फिरू लागले आहे,' असा घरचा आहेर दिला. 

'यूती'तील निकाल समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाच्या एकीचे आहेत व हेच युतीचे समीकरण 2019 मध्ये कायम राहिले तर? या विचाराने भाजपनेतृत्वाची झोप उडविली आहे. मात्र, हा सप-बसपच्या सौदेबाजीचा परिणाम असून, त्याचा संबंध आगामी सार्वत्रिक निवडणुकीशी जोडणे गैर आहे, असा युक्तिवाद भाजपने केला आहे. 

तब्बल 28 वर्षांनी गोरखपूरमध्ये व त्यातही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हक्काचा गड असलेल्या गोरखपूरमध्ये सपने भाजपला धूळ चारली असून, उपमुख्यमंत्री के. पी. मौर्य यांच्या फूलपूरमध्येही भाजपचा दारुण पराभव झाला.

पराभवाचा कल स्पष्ट होताच भाजपच्या येथील आलिशान मुख्यालयात सन्नाटा पसरला. पक्षाध्यक्ष अमित शहा दुपारी दीडच्या सुमारास येथे आले व त्यांनी काहीही न बोलता थेट आपले दालन गाठले. त्रिपुराच्या निकालानंतर याच मुख्यालयात दिसणारा उन्माद आज गायब झाला होता.

योगी आदित्यनाथ यांच्या मनात या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या मठाचे स्वामी चिन्मयानंद यांचे नाव होते व ते मोदी-शहांनी नाकारले, याचाही धागा या पराभवाशी जोडला जातो. योगींची 'वाढती क्रेझ' कमी करण्यासाठीच दिल्लीतून या पराभवाचे पडद्यामागचे नेपथ्य तयार झाले असावे, अशा शक्‍यतेची कुजबूजही भाजप वर्तुळात होती. योगी-मौर्य यांच्यातील धुसफूस जगजाहीर होऊनही मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही सांगितले जाते. सध्या हवेत असलेल्या भाजपनेतृत्वाच्या वर्तनात या पराभवानंतर काही बदल दिसेल, याची शक्‍यता मात्र राजकीय जाणकारंना वाटत नाही. 

भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांच्यासारखे नेते, पोटनिवडणुकीतील पराभव खरा नसतो; आगामी (कर्नाटक) विधानसभा निवडणुकीत पाहा, भाजपच जिंकेल, असे सांगत होते. भाजपनेतृत्वाला आता काहीही करून सपा-बसपची व त्यात सामील होऊ घातलेल्या कॉंग्रेसची युती भंग करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील, असाही सूर पक्षात उमटला आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी तर पंतप्रधानांना पत्र लिहून शेतकरी, ग्रामीण जनता व बेरोजगारांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यास गेली चार वर्षे केंद्र सरकारला अपयश आल्याचा ठपका ठेवला आहे. 

हा सप-बसपचा विजय नसून भाजपचा पराभव आहे. प्रभू रामचंद्राची निंदानालस्ती करणाऱ्यांना (नरेश आगरवाल) लाल गालीचा अंथरणाऱ्या भाजपविरोधात आता प्रत्यक्ष रामही गेले आहेत. 
- संजय राऊत, शिवसेनेचे खासदार 

गोवंश हत्याबंदी व राममंदिरासह हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या मुद्यांवर मोदी सरकारने विश्‍वासघात केला आहे. केवळ ईव्हीएमच्या चमत्काराने मिळवलेले विजयामागून विजय नव्हे; तर समाजाच्या विकासाची किती आश्‍वासने तुम्ही पाळली, यावरून जनता मूल्यांकन करते, हे लक्षात घ्या. 
- प्रवीण तोगडिया, विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com