देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ; पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सर्वत्र कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिग बी अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही टि्वटरवरून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

नवी दिल्ली : भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजपथावर संचलन झाले. यादरम्यान लष्करी सामर्थ्याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या विशेष अशा सोहळ्याला आशियातील 10 देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.  

दिल्लीतील राजपथावर भारताची संस्कृती, विविधता आणि लष्करी ताकदीचे दर्शन घडले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. या भव्य अशा सोहळ्याला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली.

पंतप्रधान मोदींनी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्यादरम्यान चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी हवाई दलाचे जवान ज्योती प्रकाश निराला यांचा मरणोत्तर अशोकचक्रने सन्मान करण्यात आला.

राजपथावरील या सोहळ्यादरम्यान महाराष्ट्राच्या चित्ररथात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दर्शन घडले. हा चित्ररथ राजपथावर आल्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ, शिवसृष्टी पाहून खासदार संभाजीराजेंची 'जय भवानी, जय शिवाजी'ची घोषणा दिली. महाराष्ट्राच्या या चित्ररथात कवी भूषण यांचे काव्य अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले. या दहा देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Web Title: Marathi News National 69th Republic Day Parade 2018 celebrating Asean Pm Narendra Modi Rajpath Delhi Army Navy Airforce