उत्तर प्रदेशातील जातीय हिंसाचारात एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जानेवारी 2018

उत्तर प्रदेशात दोन गटांमध्ये प्रचंड हिंसाचार माजला. यादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण जखमी झाला. ही घटना उत्तरप्रदेशातील कसगंज जिल्ह्यात घडली. हा हिंसाचार जातीय वादातून झाल्याचे सांगितले जात आहे. 

लखनौ : उत्तर प्रदेशात दोन गटांमध्ये प्रचंड हिंसाचार माजला. यादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण जखमी झाला. ही घटना उत्तरप्रदेशातील कसगंज जिल्ह्यात घडली. हा हिंसाचार जातीय वादातून झाल्याचे सांगितले जात आहे. 

चंदन गुप्ता असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या छातीला गोळी लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर नौशाद ही व्यक्ती यादरम्यान जखमी झाली. नौशादच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. नौशाद यास अलीगडनजीकच्या एका रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान दोन्ही गटांकडून दगडफेकही केली गेली. त्यानंतर गोळीबार करण्यात आला. 

याबाबत अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी राकेश कुमार यांनी सांगितले, की कसगंज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त यात्रा काढण्यात आल्याने या यात्रेला 'तिरंगा यात्रा' म्हणून नाव देण्यात आले होते. ही यात्रा प्रशासनाच्या परवानगीविना काढण्यात आली होती.

"या गोळीबाराच्या घटनेनंतर सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर तैनात करण्यात आला. तसेच पोलिसांकडून छापेमारीची कारवाईही केली जात आहे'', असे गृह सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले.

Web Title: Marathi News National Kasganj violence One killed one injured after shots fired during communal clash