10 रूपयांची सर्व नाणी वैधच ; रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

''रिझर्व्ह बँकेकडून 14 प्रकारचे दहा रुपयांचे चलन जारी करण्यात आले आहे. हे सर्व चलन कोणत्याही व्यवहारांसाठी स्वीकारता येऊ शकते''

- भारतीय रिझर्व्ह बँक

नवी दिल्ली : सध्या चलनात असलेले 14 प्रकारचे दहा रुपयांचे चलन वैधच आहे. हे सर्व चलन भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणले गेल्याने ते यापुढेही वैधच राहणार आहे, असे स्पष्टीकरण भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी पुन्हा एकदा दिले. दहा रुपयांचे चलनी नाणे स्वीकारण्यास काही लोकांकडून नकार दिला जात असल्याची बाब समोर आल्यानंतर आरबीआयने हे स्पष्टीकरण दिले.

गेल्या अनेक महिन्यांपासून दहा रुपयांचे चलनी नाणे काही लोकांकडून स्वीकारले जात नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज बँकेकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला. ''रिझर्व्ह बँकेकडून 14 प्रकारचे दहा रुपयांचे चलन जारी करण्यात आले आहे. हे सर्व चलन कोणत्याही व्यवहारांसाठी स्वीकारता येऊ शकते'', असे स्पष्टीकरण देण्यात आले. तसेच आरबीआयने सर्व बँकांना व्यवहारांसाठी आणि चलन बदली करताना नाणी स्वीकारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. याशिवाय आरबीआयने दहा रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या असल्याचेही सांगितले.

आरबीआयने जारी केलेल्या दहा रूपयांच्या नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजच्या असणार आहेत. दहा रूपयांच्या नव्या नोटा चॉकलेटी रंगाच्या असणार आहेत. या सर्व नोटा जुन्या नोटांच्या उंचीसारख्या असतील. 

Web Title: Marathi news National news All 14 types of Rs 10 coin valid legal tender RBI