बेळगावात कोरमअभावी बैठक रद्द

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

तालुका पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी आपली मनमानी सुरू केली असून, मंजूर झालेला बहुंताश निधी थेट आपल्या मतदारसंघात वळविला आहे. अनुसुचित जाती जमातीसाठी मंजूर झालेला एकूण 26 लाख निधी आपल्या मतदारसंघात परस्पर वळविला असल्याचा आरोप काँग्रेसच्या आणि भाजपच्या सदस्यांचा आहे.

बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणांनी देत तालुका पंचायत सभागृह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (ता.16) घुमविला. सदस्यांच्या नामफलक कानडीबरोबर मराठीतूनही लावण्यात यावा. मराठीतून कागदपत्रे द्यावी, या मागण्या सदस्यांनी या बैठकीत केल्या. मात्र, बैठकीला काँग्रेसच्या काही सदस्यांनी आणि भाजपच्या सदस्यांनी पाठ फिरवल्यामुळे कोरम अभावी बैठक रद्द करण्यात आल्याची घोषणा अध्यक्षांनी केली. 

तालुका पंचायतीची सर्वसाधारण बैठक तालुका पंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. तालुका पंचायतीचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील, उपाध्यक्ष मारूती सनदी अधिकारी एस. के. पाटील उपस्थित होते. बैठकीच्या नियोजित वेळेतही सदस्य सभागृहात दाखल झाले नाहीत. त्यानंतर सदस्य येत होते. बैठकीला सुरवात करण्यात आली. बैठकीच्या सुरवातीलाच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा दिली. यावेळी सर्व सदस्य उभे राहून घोषणा देत होते.

कित्येकवेळा मागणी करूनही मराठीतून कागदपत्रे, बैठकीचे इतिवृत्त आणि इतर पत्रके कानडीबरोबर मराठीतूनही द्यावी, अशी अनेकवेळा मागणी केली. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मराठी सदस्यांनी केला. यावेळी सदस्यांनी संयुक्त महाराष्ट्रासह 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देऊन सभागृह घुमवून सोडला.

कार्यालयाच्या दुरूस्ती करण्यात आली असून, कार्यालयामध्ये तालुका पंचायतीच्या सर्व सदस्यांचे नाव असलेला नामफलक लावण्यात आला आहे. पण तो फलक केवळ कन्नडमध्येच लावण्यात आला आहे. फलकावर कन्नडबरोबर मराठीचाही उल्लेख असावा, अशी मागणी मराठी सदस्यांनी यापूर्वीच निवेदनाव्दारे केली आहे. पण अधिकाऱ्यांनी अजून त्या फलकावर मराठीतून उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठी सदस्यांनी आज बैठकीच्या सुरवातीलाच मागणी केली. बैठकीला काँग्रेसचे केवळ 17 सदस्य उपस्थित होते. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे 9 सदस्य उपस्थित होते. बैठकीला सुरवात झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सदस्यांची हजेरी घेतली. 

यावेळी मराठी सदस्यांनी इतिवृत्ताच्या रजिस्टरवर सही करणार नसल्याचे सांगितले. भाजप आणि काँग्रेसच्या काही सदस्यांनी बैठकीला जाणून बुजून गैरहजेरी दर्शविली होती. त्यामुळे बैठक घेण्यासाठी 23 सदस्यांची गरज असते. तितक्‍या सदस्यांनी इतिवृत्तावर सही केली नाही. केवळ 17 सदस्यांनी सही केली होती. परिणामी कोरम अभावी बैठक रद्द करावी लागली.

यावेळी सदस्य रावजी पाटील, सुनिल अष्टेकर, आप्पासाहेब कीर्तने, नारायण नलवडे, निरा काकतकर, मनिषा पालेकर, रेणुका सुळगेकर, लक्ष्मी मेत्री आदी मराठी सदस्यांनी मराठीची मागणी लावून धरली. 

Web Title: Marathi News National News Belgaon News Maharashtra Ekikaran Samiti