भाजपच्या सत्तेत दलितांवर अत्याचार : काँग्रेस

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जानेवारी 2018

''समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचे लोक प्रयत्न करत आहेत. या हिंसाचारामागे त्यांचा हात आहे''

(मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते )

नवी दिल्ली : ''समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचे लोक प्रयत्न करत आहेत. या हिंसाचारामागे त्यांचा हात आहे'', असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेत केला. 

कोरेगाव भिमा हिंसाचाराचे राज्यासह इतर ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. तसेच राजकीय स्तरावरही याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर या हिंसाचाराबाबत लोकसभेतही गदारोळ निर्माण झाला आहे. मलिक्कार्जुन खर्गे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला.

ते म्हणाले, ''या हिंसाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली जावी. या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन करायला हवे. ते शांत बसू शकत नाही''. असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांचा उल्लेख 'मौनी बाबा' म्हणून केला. 

दरम्यान, उना येथे दलितांना झालेली मारहाण, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आता भीमा कोरेगावची घटना या तीनही घटना याबाबतची स्पष्ट उदाहरणे आहेत. या सर्व बाबींवरून संघ आणि भाजपच्या तीव्र दलितविरोधी विचारसरणीचे पुन्हा एकदा दर्शन झाले, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल (मंगळवारी) केला होता. 

 

Web Title: marathi news national news koregaon bhima riots congress criticizes BJP and RSS