पंतप्रधान मोदी देशाचा विकास करणार कधी? ; राहुल गांधींचा सवाल

National News Narendra Modi Country Development Rahul Gandhi
National News Narendra Modi Country Development Rahul Gandhi

बंगळूर/बळ्ळारी : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी कर्नाटकाचा विकास करून दाखविला. परंतु, सतत खोटे बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरवात करणार, असा प्रश्‍न अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. होस्पेट (जि. बळ्ळारी) येथे आज कॉंग्रेसच्या जनाशीर्वाद मेळाव्यात ते बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले, की संकटकालीन परिस्थितीत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. पंतप्रधानांनी किमान सिद्धरामय्यांचे कार्य पाहून तरी बोध घ्यावा. खरे बोलून त्याप्रमाणे वर्तणूक करतात, अशा लोकांवर विश्‍वास ठेवावा. खोटे बोलणाऱ्यांवर विश्‍वास ठेवू नये. कॉंग्रेस केवळ सत्याच्या बाजूने आहे. कॉंग्रेसने दिलेली आश्‍वासने सिद्धरामय्या सरकारने पूर्ण केली आहेत. मोदींनी सांगितलेले कसे खोटे आहे, हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवितो. हैदराबाद-कर्नाटकासाठी "371 जी'ची अंमलबजावणी कॉंग्रेस सरकारने केली. केंद्रात संपुआ सरकार असताना सर्वप्रथम मी व सोनिया गांधींनी घटनादुरुस्तीला पाठिंबा देऊन हैदराबाद-कर्नाटकाला विशेष दर्जा मिळवून दिला. भाजपचे नेते लालकृष्ण अडवानी यांनी हे करणे शक्‍य नसल्याचे म्हटले होते. याद्वारे मिळणारे 350 कोटींच्या अनुदानात वाढ करून चार हजार कोटी रुपये करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींनी संसदेत एक तास भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी शहरवासीयांच्या समस्या सोडविण्यावर चकार शब्दही काढला नाही. देशातील युवकांना रोजगार देण्यावर ते काही बोलले नाहीत. आपल्या एक तासाच्या भाषणात त्यांनी केवळ कॉंग्रेसवर टीका करण्याचे काम केले. जनतेच्या समस्या त्यांना दिसल्याच नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

...तर राजीनामा देईन : खर्गे 

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्‍मीर सोडून दिले होते, हे सिद्ध करून दाखविल्यास त्याच क्षणी राजीनामा देईन, असे आव्हान मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. कॉंग्रेसने गेल्या 70 वर्षांत काहीच केले नसल्याचा आरोप पंतप्रधान मोदी करतात. कॉंग्रेसने काहीच केले नसते तर तुम्ही चहा विकणारे पंतप्रधान झाला असता का, असा प्रश्‍न खर्गे यांनी केला. आम्ही 70 वर्षांपासून घटनेचे संरक्षण केले. परंतु, तुम्ही अधिकारावर येताच घटना बदलण्याची भाषा करीत आहात. गुजरात मॉडेल खोटे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये महिलांना पौष्टिक आहाराचा अभाव असल्याची टीका खर्गे यांनी केली. 

पंतप्रधानपदाला मोदी अपात्र 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, की पंतप्रधान मोदी कर्नाटकाच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी पंतप्रधानपदाला शोभणारे वक्तव्य केले नाही. त्यांनी बोलताना खालची पातळी गाठली. भ्रष्टाचारी येडियुरप्पा व कट्टा सुब्रमण्य नायडू यांच्यासारख्यांना बाजूला बसवून ते भ्रष्टाचारावर बोलतातच कसे? असा प्रश्‍न करून आमच्या सरकारला दहा टक्के कमिशन सरकार म्हणून ते आरोप करतात. मोदी पंतप्रधानपदासाठी पात्र नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com