रजनीकांतचे आध्यात्मिक राजकारण 

पीटीआय
सोमवार, 1 जानेवारी 2018

गेल्या दोन दशकांपासून रजनीकांत यांनी राजकीय प्रवेशाविषयी गुप्तता बाळगली होती. मात्र अनेक वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर रजनी यांनी 31 डिसेंबरचा मुहूर्त साधत पक्षस्थापनेची घोषणा केली. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे.

चेन्नई : आपल्या अनोक्‍या शैलीने फिल्मजगताचा मेगास्टार बनलेल्या रजनीकांत यांनी आता राजकीय प्रवासास सुरवात केली आहे. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी पावलोपावली त्यांना साथ दिली असून राजकारणाच्या आखाड्यातही रजनी यांना तामिळी जनता साथ देईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

रजनीकांत यांचा जीवनप्रवास खडतर आहे. बंगळूरू येथील एका मराठी कुटूंबातील शिवाजीराव गायकवाड दक्षिणेत जातो काय आणि सुपरस्टार रजनीकांत होतो काय, हे सारे काही अकल्पनीय आहे. रजनीकांत यांनी अपेक्षेप्रमाणे एम.जी. रामचंद्रन आणि जयललिता यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. रामचंद्रन आणि जयललिता यांनी फिल्मी जगतातील यशानंतर राजकारणातही आपला प्रभाव दाखविला होता. 

गेल्या दोन दशकांपासून रजनीकांत यांनी राजकीय प्रवेशाविषयी गुप्तता बाळगली होती. मात्र अनेक वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर रजनी यांनी 31 डिसेंबरचा मुहूर्त साधत पक्षस्थापनेची घोषणा केली. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यातच सध्याच्या तामिळनाडूतील सत्ताकारणातही अनेक रहस्यमयी घटना घडत आहेत. डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करुनानिधी यांनीही दीर्घकालीन राजकारणानंतर निवृत्तीचे संकेत दिले आहेत. अशामध्ये पोकळी भरून काढण्याचे काम रजनीकांत करतील का हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

रजनीकांत यांचा खडतर प्रवास

 रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी कर्नाटकातील मराठी कुटूंबात झाला. रजनी यांच्या आई रामाबाई आणि वडील रामोजीराव गायकवाड हे सर्वसाधारण कुटुंब. रजनी यांनी सुरवातीला बस वाहकाची नोकरी केली. मात्र सिनेसृष्टीत मोठे काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी बसवाहकाच्या नोकरीला रामराम केला. 

असे झाले पदार्पन 

रजनी यांना पहिली संधी दिग्दर्शक के. बालचंदर यांनी दिली. मात्र रजनी यांचे खऱ्या पदार्पण अपूर्वा रगांगळ या चित्रपटाने झाले. याच चित्रपटाने शिवाजीराव गायकवाड यांना रजनीकांत असे नाव मिळाले, आणि एका स्वप्नवत प्रवासास सुरवात झाली. 

अनोख्या स्टाईलची भुरळ 
सिनेसृष्टीत अनेकांची स्टाईल ही त्यांची "सिग्नेचर' अर्थात ओळख बनते. रजनीकांत तर भारतीय सिनेसृष्टीतील स्टाईलचे बादशाह आहेत. त्यांचे डाव्या पायाने बंगल्याचे गेट उघडत सिगारेट हवेत फेकून ओढणे हे केवळ लाजवाब. 

क्रेझी फॅन 
रजनी आणि क्रेझी फॅन असे समीकरणच बनले आहे. रजनी यांच्या सिनेमाची सुरवातही काही ठिकाणी फटाक्‍यांच्या आतिषबाजीने, रजनी यांच्या प्रतिमा अथवा पुतळ्याला दुग्धाभिषेक करून, हार घालून होते. 

रजनी यांचा परिवार 
रजनीकांत यांनी तामिळ ब्राम्हण लता यांच्याशी लग्न केले. त्यांना ऐश्‍वर्या व सौंदर्या या दोन मुली आहेत. 

मराठी विरोधाचे राजकारण 
रजनीकांत हे मूळचे मराठी असून या मुद्द्याचे राजकारण विरोधकांकडून करण्यात येण्याची शक्‍यता आहे. याचसोबत कावेरी पाणीप्रश्‍नी त्यांनी कर्नाटकची साथ दिल्याबद्दलही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे कर्नाटक धार्जिणे म्हणूनही त्यांच्यावर टीका केली जाण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: marathi news national news superstar Rajnikant spiritual politics