आईच्या अंत्यसंस्कारासाठी मुलांनी मागितली रूग्णालयात भीक

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

तामिळनाडूतील एका सरकारी रुग्णालयात कॅन्सरग्रस्त विजया या चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. विजयाच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने या दोन्ही मुलांनी भीक मागून मृत आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे जमा केले. 

डिंडीगुल : तामिळनाडूतील एका सरकारी रुग्णालयात कॅन्सरग्रस्त विजया या चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. विजयाच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने या दोन्ही मुलांनी भीक मागून मृत आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे जमा केले. 

विजया या डिंडीगुल येथे मजुरीचे काम करत होत्या. त्यांच्या पतीचे 9 वर्षांपूर्वी निधन झाले होते. मोहन (14) आणि वेलमुरुगन (13) या दोन्ही मुले आणि एका मुलीचा सांभाळ करण्यासाठी मजुरीचे काम करत होत्या. घरची परिस्थिती पाहून त्यांची दोन्ही मुलेदेखील मजुरीचे काम करत होती. काही दिवसानंतर विजया यांना कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना डिंडीगुल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान विजया यांचा मृत्यू झाला. 

विजया यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खातून सावरताना त्यांना प्रश्न पडला, तो विजया यांच्या अंत्यसंस्काराचा. विजया यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते. म्हणून त्यांच्या दोन्ही मुलांनी रुग्णालय परिसरात भीक मागून अंत्यसंस्कारासाठी पैसे जमा केले. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाला समजल्यानंतर संचालक मालती प्रकाश यांनी मुलांना सहानुभूती दाखवत अंत्यसंस्कारासाठी पैशांची मदत केली. 
 

Web Title: Marathi news National News Tamilnadu News Mother Death Child asking for money