अयोध्याप्रकरणी सुनावणी आता 8 फेब्रुवारीला 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुख्य पक्षकार अंतिम सुनावणीस मुकले 
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद या वादाचे मुख्य पक्षकार महंत रामचंद्रदास परमहंस आणि हाशीम अन्सारी हे आज सर्वोच्च न्यायालयात सुरू झालेल्या अंतिम सुनावणीस मुकल्याची भावना व्यक्त होत आहे. महंत रामचंद्रदास यांनी रामलल्लाचे दर्शन व पूजेची परवानगी मिळण्यासाठी सर्वप्रथम 1949 मध्ये स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती.

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या 8 फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल 13 याचिकांवर आज सुनावणी केली. याचिकांवर सर्वोच्च न्यायलयाच्या तीन न्यायधीशांचे पीठ सुनावणी करत असून, त्यात सरन्यायधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पीठात न्यायधीश एस. ए. नजीब आणि न्यायधीश अशोक भूषण यांचा समावेश आहे. 

उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागा 2.77 एकर जागांची तीन भागांत विभागणी करून ती जमीन हिंदू, मुस्लिम आणि निर्मोही आखाड्याला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधातील याचिकांवर सुनावणी 8 फेब्रुवारी 2018 रोजी होईल. तत्पूर्वी सुन्नी वक्‍फ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची सुनावणी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर घेण्याची मागणी केली. कारण हे प्रकरण एनडीएच्या निवडणूक मुद्द्यात सामील असल्याने या प्रकरणाला राजकीय बाजू असल्याचे सिब्बल म्हणाले. तसेच या प्रकरणाची कागदपत्रे अजूनही पूर्ण नाहीत आणि पाच किंवा सात न्यायधीशांच्या पीठाने यावर लोकसभा निवडणुकीनंतर सुनावणी करायला हवी, अशी मागणी सिब्बल यांनी केली. यावर उत्तर प्रदेश सरकारचे वकील तुषार मेहता म्हणाले, की कागदपत्रे सुन्नी वक्‍फ बोर्डाचे असताना भाषांतरित प्रत देण्याची गरज काय? मुस्लिम समाजाच्या वतीने बाजू मांडणारे राजीव धवन म्हणाले, की जर सोमवार ते शुक्रवारपर्यंत सुनावणी होत असेल तरीही हे प्रकरण वर्षभर चालेल. रामलल्लाची बाजू मांडणारे हरीश साळवी यांनी न्यायालयात मोठे पीठ उभारण्यास विरोध केला. न्यायालयाबाहेर चाललेल्या राजकारणाकडे कोर्टाने लक्ष देऊ नये, असे साळवी म्हणाले. 

मुख्य पक्षकार अंतिम सुनावणीस मुकले 
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद या वादाचे मुख्य पक्षकार महंत रामचंद्रदास परमहंस आणि हाशीम अन्सारी हे आज सर्वोच्च न्यायालयात सुरू झालेल्या अंतिम सुनावणीस मुकल्याची भावना व्यक्त होत आहे. महंत रामचंद्रदास यांनी रामलल्लाचे दर्शन व पूजेची परवानगी मिळण्यासाठी सर्वप्रथम 1949 मध्ये स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. तेथेच हाशीम अन्सारी यांनी बाबरी मशिदीच्या जागेवर बसवलेली रामाची मूर्ती हटविण्यासाठी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, महंत रामचंद्रदास यांचे 2003 मध्ये तर, हाशीम अन्सारी यांचे गेल्यावर्षी जुलैत निधन झाल्याने दोघेही या सुनावणीस मुकल्याची भावना व्यक्त होत आहे. रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या घटनेचे अन्सारी साक्षीदार होते. त्यांनी सर्वप्रथम न्यायालयात खटला दाखल केला होता. महंत भास्करदास हेही मुख्य पक्षकारांपैकी एक होते. 1959 मध्ये त्यांनी रामजन्मभूमीच्या जागेवर दावा केला होता. त्यांचेही यावर्षी निधन झाले.

Web Title: marathi news national Supreme Court Fixed The Ayodhya Dispute Matter For Further Hearing On next year February 8 2018