'त्या' वक्तव्यावरून अखेर केंद्रीय मंत्री हेगडेंचा माफीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

मी देशाचे संविधान, संसद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनोभावे आदर करतो. संविधान माझ्यासाठी सर्व काही आहे. त्यावर कोणतीही शंका नाही. मी देशाचा नागरिक असल्याने मी त्याविरोधात कधीही जाणार नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला

(अनंतकुमार हेगडे, केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री )

नवी दिल्ली : राज्यघटना बदलण्याबाबत केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी त्यांच्या वक्तव्यावरून संसदेत माफी मागितली. ते म्हणाले, ''मी देशाचे संविधान, संसद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनोभावे आदर करतो. संविधान माझ्यासाठी सर्व काही आहे. त्यावर कोणतीही शंका नाही. मी देशाचा नागरिक असल्याने मी त्याविरोधात कधीही जाणार नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला'', अशा शब्दांत त्यांनी माफी मागितली.

हेगडे यांनी कर्नाटकातील एका सभेत बोलताना राज्यघटनेतील 'धर्मनिरपेक्ष' शब्दास हरकत घेऊन अशी कोणती संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचे सांगून ही राज्यघटना बदलण्यासाठीच त्यांचा पक्ष सत्तेत आल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून लोकसभेसह इतर ठिकाणी तीव्र पडसाद उमटले होते. तसेच काँग्रेसच्या सदस्यांनी हेगडे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे अशी मागणी करुन सरकारला धारेवर धरले होते. 

याशिवाय राज्यसभेतील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उपस्थित करताना केंद्रीय मंत्री राज्यघटनेच्या संरक्षणाची शपथ घेत असतात आणि जर हेगडे यांचा या राज्यघटनेवर विश्‍वास नसेल तर त्यांना मंत्रिमंडळातच नव्हे तर संसद सदस्य म्हणून राहण्याचाही अधिकार नाही, असे सांगितले होते. 

त्यानंतर आज अखेर हेगडे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून लोकसभा आणि राज्यसभेत माझ्या वक्तव्यावरून गदारोळ झाला. मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो संविधान हे माझ्यासाठी सर्वोच्च असे आहे. संसद माझ्यासाठी सर्वोच्च आहे, अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. 

दरम्यान, हेगडे यांच्या माफीनाम्यानंतर या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Web Title: marathi news national Union minister Hegde apologises for Change Constitution remark says comment put out of context