'पद्मावत'च्या विरोधात आंदोलकांनी 'चुकून' पेटवली सहकाऱ्याचीच गाडी! 

पीटीआय
गुरुवार, 25 जानेवारी 2018

भोपाळ : संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या चित्रपटाला हिंसक विरोध करणाऱ्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात आपल्याच सहकाऱ्याची गाडी जाळली. गुरुग्राममध्ये शाळेच्या बसवर हल्ला केल्यानंतर करणी सेनेच्या कृत्यांना देशभरातून विरोध होत आहे. 

या पार्श्‍वभूमीवर भोपाळमध्ये काल (बुधवार) झालेल्या हिंसाचारातील ही घटना समोर आली आहे. भोपाळमधील ज्योती टॉकीज चौकात करणी सेनेच्या आंदोलकांनी रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये त्यांनी रस्त्यात उभी असलेली एक चारचाकी गाडी जाळली. पण ही गाडी त्याच आंदोलकांपैकी एकाची होती, असे नंतर लक्षात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवत मोठी दुर्घटना टाळली. 

'या प्रकरणात आंदोलकांपैकी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे' अशी माहिती भोपाळचे पोलिस महासंचालक धर्मेंद्र चौधरी यांनी 'पीटीआय'ला दिली. 

'पद्मावत' चित्रपटातून राणी पद्मावती यांचा अपमान करण्यात आला आहे, असा आरोप करत करणी सेनेने देशभर या चित्रपटाला विरोध केला आहे. गेल्या काही दिवसांत या विरोधाला हिंसक वळण लागले आहे. राजस्थानमध्ये काही शहरांमध्ये थिएटर्सची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे काही थिएटर मालकांनी 'पद्मावत' प्रदर्शित न करण्याची भूमिका घेतली आहे.

Web Title: marathi news Padmavat Movie protests Karani Sena