अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन

अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन

पुणे : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले.

चंदेरी दुनियेत गेली अनेक दशके लुकलुकणारी "चाँदनी" 54 व्या वर्षी अचानक लुप्त पावल्याने तिच्या लाखो चाहत्याना मोठा धक्का बसला आहे. 

तामिळनाडुतील सिवाकासी येथे 13 ऑगस्ट 1963 रोजी श्रीदेवी हिचा जन्म झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षीच तिने "थुनाईवन" या चित्रपटाद्वारे अभिनयाचा "श्रीगणेशा" केला. त्यानंतर अनेक वर्ष तेलगु, तामिळ, मल्याळम व कन्नड चित्रपटात तिने बाल कलाकार म्हणुन काम केले. तर बॉलीवुडमध्येही 1975 मध्ये आलेल्या "ज्युली" चित्रपटात तिला बाल कलाकार म्हणुन काम करण्याची संधी मिळाली.1976 मध्ये आलेल्या "मोंदुरु मूडुचु" या तामिळ चित्रपटात वयाच्या 13 व्या वर्षी मुख्य नायिकेचे पात्र साकारता आले. 

"श्रीदेवी" या नावाने ती तामिळ व तेलगु चित्रपटात मुख्य भूमिकेत  झळकू लागली. तर  बॉलीवुडमध्ये 1978 ला "सोलवा सावन" या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत श्रीदेवी झळकली. हिम्मतवाला, मवाली, तोफा, नया कदम, मक्सद, मास्टरजी, नजराना असे कित्येक "हिट" चित्रपट तिने उमेदीच्या कालात दिले. "मिस्टर इंडिया", "चाँदनी", "सदमा" या चित्रपटातील तिच्या अनोख्या अभिनय शैलीवर त्यावेळची तरुणाई अक्षरश: फिदा झाली.

"खुदा गवाह", "लाडला", "जुदाई" असे उत्कृष्ट चित्रपटही तिने दिले. लग्नानंतर काही काळ ती संसारात रमली. त्यानंतर "इंग्लिश विंग्लिश"द्वारे श्रीदेवीने सुरु केलेली "सेकेंड इनिंग" मध्यमवर्गीयांच्या मनात घर करुन गेली. तब्बल पाच वेळ "फिल्म फेअर अवॉर्ड" तिने पटकाविला. तर केन्द्र सरकारने श्रीदेवीला "पद्मश्री" देऊन तिचा यथोचित सन्मान केला.

अभिनयाच्या शिखरावर असताना राकेश रोशन यांच्या "जाग उठा इन्सान" या चित्रपटावेळी अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या ती प्रेमात पडली. काही काळ त्याच्याबरोबर संसार केला. पुढे त्यांच्यात बेबनाव झाल्याने मिथुनला सोडचिट्टी देऊन तिने बोनी कपूर बरोबर नवा संसार थाटला तो अखेरपर्यंत..! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com