...यामुळे झाला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा उद्रेक?  

शुक्रवार, 12 जानेवारी 2018

ओडिसा हायकोर्टाचे माजी न्यायाधीश इशरत मशरूर कुद्दुसी यांना सप्टेंबर 2017 मध्ये 'सीबीआय'ने अटक केल्यानंतरच्या घडामोडी आज सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या अभूतपूर्व घटनेमागे असण्याची शक्यता आहे. 

ओडिसा हायकोर्टाचे माजी न्यायाधीश इशरत मशरूर कुद्दुसी यांना सप्टेंबर 2017 मध्ये 'सीबीआय'ने अटक केल्यानंतरच्या घडामोडी आज सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या अभूतपूर्व घटनेमागे असण्याची शक्यता आहे. 

कुद्दुसी यांना 21 सप्टेंबर 2017 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने दोन वर्षे प्रवेश बंदी घातलेले लखनौमधील मेडिकल कॉलेज सुरू करून देण्यासाठी कुद्दुसी यांनी लाच घेतली, असा 'सीबीआय'चा आरोप आहे. केंद्रीय अधिकारी आणि न्यायालयात आपल्याला अनुकूल निकाल करून घेऊया, असे कुद्दुसी यांनी प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे चालक बी. पी. यादव आणि पलाश यादव यांना सांगितल्याचे 'सीबीआय'चे म्हणणे आहे. 

दुसरीकडे, कुद्दुसी यांना नाहक फसविल्याचा आरोप त्यांचे बंधू नुसरत कुद्दुसी यांनी केला होता. बाबरी मशीद प्रकरणात कुद्दुसी साक्षीदार असल्याने त्यांना फसविण्यात आल्याचे नुसरत यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले होते. 

कुद्दुसी अटक प्रकरण नोव्हेंबर 2017 मध्ये वेगळ्या वळणावर आले. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. तिथून सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि अन्य ज्येष्ठ न्यायाधीशांमध्ये दरी वाढत गेल्याची शक्यता समोर येत आहे. 

कुद्दुसी यांच्यावर ज्याप्रकरणात लाचखोरीचा आरोप झाला, ते प्रकरण सुनावणीसाठी मिश्रा यांच्या पीठापुढे होते. मात्र, त्यापैकी कोणत्या न्यायमूर्तींना लाच देण्याचा प्रयत्न झाला, हे कधीही स्पष्ट झालेले नाही. नोव्हेंबरमध्ये जेव्हा चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे आली, तेव्हा या संपूर्ण प्रकरणात आपल्याला हवे तेच न्यायमूर्ती नेमावेत, असा आग्रह सरन्यायाधीश मिश्रा यांनी धरला होता.

याचिका सर्वोच्च न्यायालयातील दुसऱया क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती जस्ती चेलामेश्वर यांच्यापुढे सुनावणीसाठी आली होती. मात्र, सरन्यायाधीशांच्या आग्रहापोटी ही याचिका अन्य पीठाकडे सुनावणीसाठी पाठविण्यात आली. त्यापाठोपाठ याच विषयावर आणखी एक याचिका न्या. चेलामेश्वर यांच्यापुढे आली. या प्रकरणात कोणतेही निर्णय देऊ नयेत, असे सरन्यायाधीश मिश्रा यांनी लेखी कळविले असतानाही न्या. चेलामेश्वर यांनी लाचखोरीचे प्रकरण अस्वस्थ करणारे असल्याचे सांगत सुनावणी सुरू केली. सरन्यायाधिशांनी पुन्हा एकदा हे प्रकरण त्यांच्या सूचनेनुसार त्यांना हव्या असलेल्या पीठापुढेच चालेल, असे स्पष्ट केले. 

दुसऱयांदा दाखल झालेल्या याचिकेत प्रख्यात वकील प्रशांत भूषण काम पाहत आहेत. त्यांनी सरन्यायाधीश मिश्रा यांच्याशी नोव्हेंबरमध्ये वादही घातला होता. सरन्यायाधीश सदस्य असलेल्या पीठाने ज्या प्रकरणामध्ये काम पाहिले आहे, त्या प्रकरणात लाचखोरीचा आरोप होत असल्याने त्याची सुनावणी सरन्यायाधीशांच्या आवडीच्या पीठाने घेऊ नये, अशी भूमिका भूषण यांनी मांडली. त्यावरून त्यांनी आकांडतांडवही केले. तथापि, सरन्यायाधीश आपल्या मतावर ठाम राहिले. 

आज (शुक्रवार) नवी दिल्लीत घडलेल्या धक्कादायक घडामोडींमध्ये न्या. चेलामेश्वर प्रमुख होते. त्यांनी भारतीय न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे विधान केले आहे. आतापर्यंतचा घटनाक्रम पाहता उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींवर होणारे लाचखोरीचे आरोप आणि त्या आरोपांची सुनावणी आपल्याला हव्या त्याच खंडपीठापुढे घेण्याचा सरन्यायाधिशांचा आग्रह, हा प्रकार आज चार न्यायमूर्तींच्या संतापाचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरल्याची शक्यता दिसते आहे. 

Web Title: marathi news Supreme Court of India Chief Justice Dipak Misra Justice Chelameswar