विराटच्या नावाने उत्तर प्रदेशात बनावट व्होटर स्लीप

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

गुरूवारी मतदान बूथ अधिकारी सुनिता यांनी सहजनवा विधानसभा क्षेत्रातील क्र. 822 च्या मतदाराच्या स्लीपवर विराट कोहलीचे नाव व फोटो असणारी स्लीप बघितली व वरिष्ठांना कळविले.

लखनौ : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव व फोटो असलेली निवडणूकीची मतदान स्लीप आढळली आहे, त्यामुळे निवडणूक आयोगकडून याबाबतची चौकशी करण्याचे आदेश आले आहेत. गोरखपूरमधील सहजनवा सब-डिव्हीजन या विभागात ही स्लीप मिळाली. याच विभागात रविवारी पोटनिवडणूक होणार आहे. 

उपमुख्य निवडणूक अधिकारी रत्नेश सिंह यांनी गोरखपूर प्रशासनाकडून याबाबत अहवाल मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. गुरूवारी मतदान बूथ अधिकारी सुनिता यांनी सहजनवा विधानसभा क्षेत्रातील क्र. 822 च्या मतदाराच्या स्लीपवर विराट कोहलीचे नाव व फोटो असणारी स्लीप बघितली व वरिष्ठांना कळविले. त्या म्हणाल्या की, 'स्लीप वाटपादरम्यान ही स्लीप बघितल्याने मला आश्चर्य वाटले, म्हणून मी मतदार यादीत नाव शोधले, तर अशा प्रकारचे कोणतेही नाव यादीत आढळले नाही. त्यामुळे मी ही स्लीप या विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिली.'

गोरखपूरचे जिल्हा दंडाधिकारी राजीव रौतेला यांनी सांगितले की, सहजनवा मतदार संघातील उप-विभागीय दंडाधिकारी व तहसीलदार यांना या विषयी प्रश्न विचारण्यात आला. मतदार यादीत व स्लीपमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

Web Title: Marathi news uttar pradesh news duplicate voters card virat kohali