खा. विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट कापले

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

राम मंदिर निर्माणासाठी अडवाणी यांना पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींवर दबाव आणण्यात आला या निर्णयामुळे त्यांचे तिकीट कापले गेले अशी चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये चालू असल्याचे कळते. 

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर संबंधित आंदोलनात महत्त्वाची भूमिका असलेले खासदार विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट कापण्यात आले आहे. कटियार हे भाजपचे पाच वेळा खासदार राहिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागा आहेत, पण भाजपने कटियार यांना उमेदवारी दिली नाही. 

1984 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजप केवळ दोन लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित होती, 1989 मध्ये भाजपला 85 जागांवर पोहोचवण्याच्या यशात त्यांचेही मोलाचे योगदान आहे. कटियारांना वगळून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ सहकाऱ्यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे. राम मंदिर निर्माणासाठी अडवाणी यांना पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींवर दबाव आणण्यात आला या निर्णयामुळे त्यांचे तिकीट कापले गेले अशी चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये चालू असल्याचे कळते. 

2006 पासून कटियार हे राज्यसभा सदस्य आहेत. येत्या 2 एप्रिलला त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपेल. उत्तर प्रदेशमधील फैजाबादमधून ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. पण तिकीट कापल्यामुळे इतक्या वर्षांनी प्रथमच ते संसदेत जाऊ शकणार नाहीत. काही वेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे.  

अरूण जेटली, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, कांता कर्दम, अनिल जैन, जीव्हीएल नरसिम्हा राव, हरनाथसिंह यादव, अशोक वाजपेयी या नेत्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. जेटली आणि राव हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. तर अशोक वाजपेयी हे समाजवादी पक्ष सोडून भाजपात आले आहेत. इतर पाच नेते हे उत्तर प्रदेशमधील स्थानिक नेते आहेत. त्यामुळे हे सर्व नेते हे कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत.

कटियार हे 1970 मध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जोडले गेले. 1984 मध्ये त्यांनी बजरंग दलाची स्थापना केली. कटियार हे उत्तर प्रदेशमधील ओबीसी समाजातील चेहरा आहेत.

Web Title: Marathi news uttar pradesh news vinay katiyar rajyasabha ticket cancelled