'मुलाच्या वाढदिवसासाठी येणार होते, पण...' जवानाच्या पत्नीने फोडला टाहो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manipur terrorist attack

'मुलाच्या वाढदिवसासाठी येणार होते, पण...' जवानाच्या पत्नीने फोडला टाहो

नवी दिल्ली : ''पुढच्या महिन्यात मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते घरी येणार होते. शुक्रवारी त्यांनी मला फोन करून याबाबत माहिती दिली. मी दुर्गम भागात जातोय. त्यामुळे तुला फोन करू शकणार नाही, असं म्हटलं. पण, त्यानंतर त्यांचा फोन कधीच आला नाही. शुक्रवारी आलेला तो फोन अखेरचा ठरला'', असं म्हणत पत्नीने टाहो फोडला. हा आक्रोश आहे मणिपूर येथील दहशतवादी हल्ल्यात (manipur terrorist attack) शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीचा.

हेही वाचा: मणिपूर: भ्याड दहशतवादी हल्ल्यात कर्नल त्रिपाठींच्या कुटुंबाचा करुण अंत

म्यानमार बॉर्डरवर शनिवारी दहशतवाद्यांनी एक भ्याड हल्ला केला. मणिपूरमध्ये झालेल्या या हल्ल्यात ४६ रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर तीन जवान शहीद झाले. यामध्ये सुमन स्वर्गीयरी यांचा देखील समावेश आहे. सुमन हे बक्सा जिल्ह्यातील बाराम क्षेत्राजवळील थेकेराकुची कालीबारी गावचे रहिवासी असून २०११ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. दहशतवाद्यांनी २००७ मध्ये त्याचे वडील कनक स्वर्गीयारी यांची हत्या केली होती. सुमन यावर्षी जुलैमध्ये शेवटचा घरी आला होता. त्यानंतर पुढील महिन्यात मुलाच्या वाढदिवसासाठी तो घरी येणार होता. याबाबत त्याने शुक्रवारी फोन करून पत्नीला माहिती दिली होती. तसेच दुर्गम भागात जात असल्यामुळे फोन करणार नाही, असं सांगितलं होतं. पण तो फोन शेवटचा ठरला, अशी प्रतिक्रिया त्याच्या पत्नीने इंडिया टुडेसोबत बोलताना दिली.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, 46 AR च्या ताफ्यावरील भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात आज चुराचंदपूर येथे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबासह काही कर्मचारी मारले गेले आहेत. राज्य दल आणि निमलष्करी आधीच अतिरेक्यांचा माग काढण्यासाठी त्यांच्या कामावर आहेत. दोषींना न्याय मिळवून दिला जाईल, असेही म्हटले आहे.

loading image
go to top