मसूद अजहर होणार 'जागतिक दहशतवादी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 एप्रिल 2019

- पाकिस्तानमधील 'जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला बुधवारी (ता. 1 मे) 'जागतिक दहशतवादी' जाहीर करण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला बुधवारी (ता. 1 मे) "जागतिक दहशतवादी' जाहीर करण्याची शक्‍यता आहे. यावर उद्या संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) निर्णय होणार असून, त्या वेळी "जागतिक दहशतवादी' घोषित करण्याबद्दलच्या भूमिकेत चीन बदल करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताला जगभरातून पाठिंबा मिळाला होता. आता तशी घोषणा झाल्यास तो भारताचा राजनैतिक विजय ठरेल.

पुलवामातील हल्ल्यानंतर अजहरला "जागतिक दहशतवादी' घोषित करण्याची मागणी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने 13 मार्च रोजी "यूएन'कडे केली होती. परंतु, चीनने त्यात खोडा घालीत त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. या तीन देशांच्या प्रस्तावावरील तांत्रिक आक्षेप चीन हटवेल, अशी आशा आहे. "यूएन'च्या सुरक्षा समितीमधील सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Masood Azhar to be Global Terrorist