घराघरांमध्ये घुसून दहशतवाद्यांचा शोध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

व्यापक शोधमोहीम

  • दहशतवादी घरांमध्ये लपल्याची गुप्तचर विभागाची माहिती
  • लष्कर, सीआरपीएफ, पोलिसांची संयुक्त मोहीम
  • हेलिकॉप्टर, ड्रोन्सच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध
  • सुमारे 4 हजारांपेक्षा अधिक जवानांचा मोहिमेत सहभाग
  • जवळपास दोन डझन गावे खाली करण्यात आली

श्रीनगर : घरांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात हेलिकॉप्टर आणि ड्रोन्सच्या मदतीने सुमारे 4 हजारांपेक्षा अधिक जवानांनी आज व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील जवळपास दोन डझन गावे खाली करून दहशतवाद विरोधी मोहीम उघडण्यात आली आहे.

शोपियॉंमध्ये अलीकडच्या काही दिवसांत दहशतवादाशी संबंधित घटना वाढल्यामुळे सुरक्षा दलांनी हे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हान वानी चकमकीत मारला गेल्यानंतर सुरू झालेली निदर्शने आणि सुरक्षा दलांवरील दगडफेकीनंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली गेली आहे.
शोपियॉंमध्ये दहशतवादी उघडपणे फिरत असल्याचा तसेच सुरक्षा दलांविरुद्ध हलनले करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा दलांनी ही दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू-काश्‍मीर पोलिसांचे सुमारे अडीच ते तीन हजार जवान सहभाग झाले असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. यामध्ये अद्याप कोणतेही जीवितहानीचे वृत्त नाही.

येथून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या शोपियॉंमधील ही मोहीम गेल्या दशकभरातील काश्‍मीर खोऱ्यातील सर्वांत मोठी मोहीम असल्याचे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. 1990च्या दशकात दारोदार शोधमोहीम राबविली जात असे. आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली आहे. जवानांनी सर्व गावकऱ्यांना त्यांच्या घरांची योग्य पद्धतीने तपासणी करावी, यासाठी एका सार्वजनिक ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.

या मोहिमेत कोणत्याही नागरिकाला इजा पोचू नये आणि त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना राबविल्या जात असल्याचे मोहिमेत सहभागी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या भागात परदेशी पर्यटकांसह दहशतवादी लपून बसल्याच्या गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर संरक्षक साखळी आणि शोधमोहीम सुरू करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, आतापर्यंत दहशतवाद्यांशी कोणताही संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. दहशतवाद्यांच्या शोधासाठी जमिनीवरून मोहीम राबविणाऱ्या सुरक्षा दलांना ड्रोन्सच्या साह्याने माहिती पुरविली जात आहे. तुर्कवांगन गावात दगडफेकीची छोटी घटना घडली. त्यानंतर मोहीम सुरूच असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

    Web Title: massive door to door search of terrorists in kashmiri homes