मोदींना 'रोखण्यासाठी' एकत्र आलेल्या मायावती-अखिलेशची जोडी फुटली 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जून 2019

मोदींना रोखण्यासाठी एकत्र आलेल्या मायावती-अखिलेश यांची युती तुटली 
मायावती यांनी बसपमध्ये स्वत:च्या कुटुंबीयांची मोठ्या पदावर नियुक्ती केली लोकसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाची वर्तणूक चुकीची असल्याचा मायावतींचा आरोप 

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या बसप-सप युतीला अवघ्या तीन महिन्यांमध्येच सुरुंग लागला आहे. 'यापुढे आम्ही सर्व महत्त्वाच्या निवडणुका स्वबळावरच लढणार आहोत', अशी घोषणा बसपच्या प्रमुख मायावती यांनी आज (सोमवार) केली. यामुळे बुआ-भतिजा यांची युती अल्पजीवीच ठरली. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसमोर एकत्रित आव्हान निर्माण करण्यासाठी मायावती आणि अखिलेश यादव यांनी हातमिळविणी केली होती. पण या युतीतून त्यांनी कॉंग्रेसला वगळले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप विरोधात कॉंग्रेस आणि बसप-सप असे वेगवेगळे लढले. मोदी लाट कायम असल्याचे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा दिसून आले. कॉंग्रेस आणि बसप-सप या तीनही पक्षांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तेव्हापासूनच मायावती आणि अखिलेश यांच्यात खटके उडू लागले होते. 

'उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये बसप स्वबळावरच लढेल', अशी घोषणा मायावती यांनी आज केली. 'यापुढील सर्व महत्त्वाच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. त्यात कुणाशीही युती केली जाणार नाही', असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेतील पराभवानंतर समाजवादी पक्षाच्या वर्तणुकीवर आक्षेप घेत मायावती यांनी हा निर्णय जाहीर केला. तरीही 'हा निर्णय कायमस्वरूपी नसेल', अशी पुस्ती जोडत त्यांनी भविष्यात पुन्हा अखिलेश यादव यांच्याशी युती करण्याचा मार्ग खुला ठेवला आहे. 

'लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय जनहितासाठीच होता. त्यासाठीच जुने वैर विसरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. पण राजकीय समीकरणांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. यादव समाज हा समाजवादी पक्षाचा आधार होता. पण या समाजाने समाजवादी पक्षाकडे पाठ फिरविली असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. त्यांना त्यांचा स्वत:चा मतदार टिकवून ठेवता आला नाही, तर आम्हाला त्यांच्याशी युती करून काय फायदा होणार?', असा प्रश्‍न मायावती यांनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayawati declares that BSP SP alliance is no longer in existence