#DharampalGulati: टांगेवाला ते हजारो कोटीच्या कंपनीचा मालक; MDH च्या आजोबांची प्रेरणादायी कहानी!

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 3 December 2020

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाही लागण झाली होती पण धर्मपाल यांनी कोरोनावर मात केली होती. आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.

दिल्ली: #DharampalGulati : देशातील प्रसिध्द मसाले ब्रँडचे प्रमुख धर्मपाल गुलाटी यांचे 98 व्या वर्षी निधन झाले आहे. आज सकाळी 5:38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुलाटी 98 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाही लागण झाली होती पण धर्मपाल यांनी कोरोनावर मात केली होती. आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. व्यापार आणि उद्योगात उल्लेखनिय योगदान दिल्याबद्दल मागच्याच वर्षी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद्मभूषणने सन्मानित केलं होतं.

धर्मपाल गुलाटीच्या प्रेरणादायी प्रवास-
गुलाटी यांचा जन्म फाळणीपुर्वी 1923 ला पाकिस्तानातील सियालकोटमध्ये झाला होता. धर्मपाल गुलाटी यांचं शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झालं असून त्यांच्या जीवनाची कथा मोठी संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. 

MDH नाव कसं पडलं-
गुलाटी यांच्या वडिलांचे सियालकोट येथे मसाल्याचे दुकान होते. त्यांचे नाव महाशिया दी हट्टी होते. यामुळेच गुलाटींच्या मसाल्याच्या ब्रॅंडचे नाव MDH पडले आहे. फाळणीनंतर धर्मपाल गुलाटी यांनी 1959 साली दिल्लीत मसाल्याचे दुकान सुरु केले होते. त्यांनी दिल्लीत कधीकाळी टांगाही चालवला होता. पण आज गुलाटी यांचा देशातील मोठ्या उद्योगपतींच्या यादीत नाव घेतलं जातं. MDH यांना 2018 साळी तब्बल 213 कोटींचा फायदा झाला होता. 

MDH चे आजोबा कालवश; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या-
पाचवीत शाळा सोडल्यानंतर धर्मपाल गुलाटी यांनी अनेक ठिकाणी काम केलं. त्यांनी हार्डवेअर कधी तांदळाच्या तर वस्रोद्योग कंपन्यांत काम केलं आहे. त्यानंतर गुलाटींनी त्यांच्या वडिलांच्या दुकानातही काम केलं. वयाच्या 18 व्या वर्षी धर्मपाल यांचा विवाह झाला.   

खिश्यात होते फक्त 1500 रुपये-
फाळणीनंतर भारतात आल्यानंतर त्यांच्याजवळ फक्त 1500 रुपये होते, जे त्यांच्या वडिलांनी दिले होते. जवळ असलेल्या 1500 रुपयांमधील 650 रुपये खर्चून धर्मपाल यांनी एक टांगा (घोडागाडी) खरेदी केला होता. नंतर 1959 साली गुलाटी यांनी एक मसाल्याचे दुकान सुरु केलं ज्याचं नाव त्यांनी महाशियां दी हट्टी सियालकोट वाले असं ठेवलं होतं. MDH च्या मसाल्याचा दर्जा हळूहळू त्यांची ओळख बनत गेली. 

हेही वाचा - मास्क वापरा, अन्यथा कोविड सेंटरमध्ये सेवा करा; या राज्याच्या उच्च न्यायालयाने केला आदेश जारी​

वार्षिक उलाढाल 1000 कोटी रुपये-
प्रामाणिकपणा आणि दर्जाच्या जोरावर MDH या मसाला ब्रॅंडची प्रगत्ती उत्तरोत्तर होत गेली. प्रत्येक अडचणीवर मात करत-करत 1996 साली गुलाटी यांनी दिल्लीत मसाल्याची कंपनी सुरु केली. त्यानंतर MDH चा मसाला संपुर्ण भारतासह जगभरात प्रसिध्द आहे. सध्या MDH देशातील मसाल्यामधला सर्वात मोठा ब्रॅंड ठरला आहे. धर्मपाल गुलाटी यांची वार्षिक कमाई सध्या कोटींमध्ये आहे. मागील वर्षाची कंपनीची उलाढाल 1 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. स्वतः धर्मपाल गुलाटी यांची कमाई तब्बल 500 कोटींच्या घरात आहे. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MDH owner Dharampal Gulati died at age 98