#MeToo आलोकनाथ, अकबर यांचे पाय खोलात 

#MeToo आलोकनाथ, अकबर यांचे पाय खोलात 

नवी दिल्ली (पीटीआय) : सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरलेल्या #MeToo या कॅम्पेनमुळे पुन्हा एकदा अनेकांच्या खऱ्या चेहऱ्यांचे दर्शन झाले. अभिनेते आलोकनाथ, केंद्रीय राज्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ पत्रकार व संपादक एम. जे. अकबर हे आज सलग दुसऱ्या दिवशी या आरोपांच्या फैरींमुळे चर्चेत राहिले. आता याच क्रमवारीमध्ये गायक कैलास खेर, दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि गायक अभिजित यांच्या नावांचा समावेश झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. 

अकबर यांच्या दुष्कृत्यांवर आज पुन्हा काही महिला पत्रकारांनी भाष्य केल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रिया रमानी यांच्यानंतर सुपर्णा शर्मा, शुमा राहा, प्रेरणासिंग बिंद्रा, शुत्पा पॉल यांनीही अकबर यांच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला. अभिनेत्री संध्या मृदूल हिने पुन्हा एकदा संस्कारी बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला. एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आलोकनाथ हे माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते; पण मी आरडाओरड केल्याने बचावले. यानंतर अभिनेत्री रिमा लागू यांनी मला सावरण्यासाठी आईप्रमाणे मदत केली. या घटनेनंतर आलोकनाथ यांनी माझी माफी मागितली होती. आपण मद्यपी आहोत आणि त्यामुळेच आपले कुटुंब तुटल्याचे त्यांनी मान्य केले होते, असे तिने ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 1999 मध्ये रिलीज झालेल्या "हम साथ साथ है' या चित्रपटाच्या क्रू मेंबरनेही आज आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले. 
 

कैलास खेरकडून गैरवर्तन 
गायिका सोना महापात्रा हिने आज गायक कैलास खेर याच्या दुष्कृत्यांना वाचा फोडली. एका सांगीतिक कार्यक्रमाच्या चर्चेसाठी मी कैलास खेर यांची कॅफेमध्ये भेट घेतली होती, तेव्हा त्यांनी माझ्याशी अश्‍लील वर्तन केल्याचे महापात्रा हिने ट्‌विटमध्ये म्हटले आहे. एका प्रसिद्ध महिला लेखिकेने गायक अभिजितवर छेडछाड आणि मारहाणीचा आरोप केला. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली पत्नी सुनीता मंजुळे हिनेदेखील त्यांच्यावर मारहाणीचा आणि गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अभिनेत्री हुमा कुरेशीने मात्र "मी टू' कॅम्पेनवर भाष्य करताना महिलांनी खोटे आरोप करून इतरांना बदनाम करू नये, असा सूर आळवला आहे. 

या महत्त्वाच्या मोहिमेचा मार्ग भरकटवू नका, फक्त सत्य जनतेसमोर आणा, स्वार्थापायी खोटी तक्रार करून चांगल्या मोहिमेचे खच्चीकरण करू नका असे तिने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com