नैसर्गिक संकटांविरोधात एकत्र या : पंतप्रधान

G20_Osaka
G20_Osaka

ओसाका : नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी जी-20 देशांनी जागतिक पातळीवर एकत्र यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शनिवार) जी-20 परिषदेत केले. या परिषदेसाठी मोदी जपानला गेले होते. 

या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नैसर्गिक आपत्तीबाबत संवेदनक्षम असणाऱ्या आणि त्याला खंबीरपणे तोंड देऊ शकणाऱ्या भविष्याच्या निर्मितीवर भर दिला. 'नैसर्गिक आपत्तीमध्येही तग धरणारी यंत्रणा ही केवळ विकासासाठी आवश्‍यक नसून, नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठीही उपयुक्त आहे. अशा संकटांवर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असते. कारण, अशा आपत्तींचा सर्वाधिक फटका गरिबांनाच बसतो. म्हणूनच, या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय आघाडी उभारण्यावर माझा भर आहे. जी-20 देशांनीही यामध्ये सामील व्हावे आणि त्यांच्याकडील ज्ञानाचा जगाला फायदा करून द्यावा,' असे आवाहन मोदींनी या वेळी केले. 

'कितना अच्छा है मोदी' 
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीची काल येथे चांगलीच चर्चा रंगली. मॉरिसन यांनी मोदींबरोबर सेल्फी काढत तो ट्‌विटरवरही प्रसिद्ध केला आणि 'कितना अच्छा है मोदी' असे कौतुक हिंदीतून केले. भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुधारण्यासाठी मॉरिसन दाखवीत असलेल्या उत्साहाने आनंदी झाल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी या वेळी दिली. मोदी आणि मॉरिसन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. 

जी-20 परिषदेतील ठळक घडामोडी 
- पंतप्रधान मोदी आणि तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्यात गुंतवणूक, व्यापार, दहशतवाद्यांवर कारवाई या मुद्द्यांवर चर्चा. 
- मोदींची ब्राझीलचे अध्यक्ष जेअर बाल्सोनारो यांच्याबरोबरही द्विपक्षीय चर्चा. 
- जी-20 परिषद आटोपून मोदी मायदेशात. 

इंडोनेशियाबरोबरील व्यापार वाढविणार 
पंतप्रधान मोदी यांनी काल इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्याशीही चर्चा केली. पुढील सहा वर्षांमध्ये दोन देशांमधील व्यापार 50 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट या वेळी ठरविण्यात आले. या दोन देशांमधील व्यापार 2016 मध्ये 12.9 अब्ज डॉलर, तर 2017 मध्ये 18.13 अब्ज डॉलर होता. मोदी आणि विडोडो यांनी व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि सागरी क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याबाबतही चर्चा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com