मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, कलम 35-अ ला हात लावाल तर...

वृत्तसंस्था
रविवार, 28 जुलै 2019

काश्मीर खोऱ्यात अचानक करण्यात आलेल्या या बदलामुळे तेथे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. राज्याला विशेष अधिकार देणारे कलम 35-अ हटवण्याचे सरकारचे षड्यंत्र असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

श्रीनगर : पीपल्स डेमॉक्रॉटिक पक्षाच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवान तैनात करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर आक्षेप नोंदविला आहे. ''कलम 35-अ ला हात लावणे म्हणजे जिवंत बॉम्ब हातात घेतल्यासारखे आहे. या कलमामध्ये काही छेडछाड केल्यास जळून खाक व्हाल. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा,'' असे मुफ्ती यांनी म्हटले आहे. 

त्या पुढे म्हणाल्या, ''इतक्या मोठ्या संख्येने जवानांना खोऱ्यात तैनात केल्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीर खोऱ्यातील निर्माण झालेला राजकीय प्रश्न जवानांच्या मदतीने सोडविता येणार नाही.''

काश्मीर खोऱ्यात वारंवार होणारी घुसखोरी आणि त्यामुळे उडणाऱ्या चकमकींमुळे दहशतवाद विरोधी मोहिमा आणखी बळकट करण्यासाठी तेथे सैनिकांची कुमक वाढविण्यात आली आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यातील नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांनी केंद्र सरकारवर आक्षेप घेतला आहे. 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीर खोऱ्यात जवानांची संख्या वाढविण्याची सूचना केली होती. त्यामुळे  केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे (सीआरपीएफ) सुमारे 10 हजार जवान तेथे तात्काळ रवाना करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला. काश्मीर खोऱ्यात अचानक करण्यात आलेल्या या बदलामुळे तेथे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. राज्याला विशेष अधिकार देणारे कलम 35-अ हटवण्याचे सरकारचे षड्यंत्र असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मुनीर खान यांनीही केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mehbooba Mufti controversial statement on Article 35A