मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीने देशाबाहेर पळाला : काँग्रेस

वृत्तसंस्था
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

''पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीने देशाबाहेर पळाला''.

- रणदीप सुरजेवाला. काँग्रेस प्रवक्ते

नवी दिल्ली : ''पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी मोदी सरकारच्या मदतीने देशाबाहेर पळाला'', असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शनिवार) केला. 

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची दुसरी बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर सुरजेवाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ''घोटाळेबाज मेहुल चोक्सीला देशाबाहेर पळून जाता यावे, यासाठी मोदी सरकारने त्याला मदत केली. चोक्सीला अँटिग्वाचे नागरिकत्व कसे काय मिळाले, हे आपण सर्व पाहातच आहोत. तसेच चोक्सीला पासपोर्ट मिळावा, यासाठी परराष्ट्र मंत्रालयानेही कशी मदत केली. याबाबतची माहिती आता समोर येत आहे''. 

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये आहे. यावरुन काल (शुक्रवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता सुरजेवाला यांनीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Web Title: Mehul Choksi escaped outside of country with help of Modi government says Congress