
मेहुल चोक्सी प्रेयसीसह ट्रिपला गेला आणि अडकला?
नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील (PNB Scam) प्रमुख फरार आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला नुकतीच डॉमिनिका या देशात अटक झाली. त्यानंतर त्याला डॉमिनिका सरकारनं अँटिग्वा देशाच्या हवाली केलं. मात्र, चोक्सी कसा पकडला गेला याबाबत अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉवनी (Antigua PM Gaston Browni) यांनी माहिती दिल्याचा दावा अँटिग्वा न्यूजरुम या वृत्तसंस्थेनं केला आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Mehul Choksi goes on a romantic trip with his girlfriend and gets stuck says Antigua PM)
एएनआयच्या वृत्तानुसार, अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉवनी यांनी म्हटलं की, मेहुल चोक्सी कदाचित त्याच्या गर्लफ्रेंडला रोमॅन्टिक ट्रिपसाठी डॉमिनिकात घेऊन गेला आणि तिथे इंटरपोलच्या जाळ्यात अडकला. असं वृत्त अँटिग्वा न्यूजरुम या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
दरम्यान, मेहुल चोक्सी डॉमिनिकात सापडल्यानंतर भारतानं त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले मात्र ते फोल ठरले. कारण डॉमिनिकानं इमिग्रेशन कायद्याच्या अधिन राहून चोक्सीची रवानगी त्याचं नागरिकत्व असलेल्या अँटिग्वाकडे केली. कायदेशीररित्या चोक्सीला भारतात पाठवता येणं शक्य नसल्यानं त्याचं प्रत्यार्पण होऊ शकलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.
भारतात पंजाब नॅशनल बॅकेत सुमारे १४ हजार कोटींचा घोटाळा करुन हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आपला भाचा नीरव मोदी आणि कुटुंबासह भारतातून पळून गेला होता. तो सध्या अँटिग्वा या देशात असून तिथलं नागरिकत्व त्यानं घेतलं आहे, तर भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. तसेच नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये असून सध्या तुरुंगात आहे.